अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी   नसताना, कोणाचेही पाठबळ नसताना उत्तर प्रदेशातील एखाद्या दुर्गम खेडय़ातून मुंबईत यायचं, संघर्ष करायचा आणि आपल्या कलेच्या जोरावर बॉलीवूड नगरीत नावलौकिक मिळवायचा ही सोपी गोष्ट नाही. असाध्य ते साध्य करणारे असे अनेक कलाकार आज इंडस्ट्रीत आहेत. आत्ता नावारूपाला आलेल्या कलाकारांमध्ये असं एक नाव आवर्जून घेतलं जातं ते अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं.. रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारा हा अभिनेता गर्दीतील छोटय़ा-मोठया भूमिका करत आज एक चांगला चरित्र कलाकार म्हणून नावारूपाला आला आहे. नुकत्याच झालेल्या क्रिटिक्स पुरस्कार सोहळ्यात पंकज यांना ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटातील भूमिके साठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या निमित्ताने बोलताना भावूक झालेल्या पंकज यांनी आपण आजचं यश साध्य करू शकलो ते फक्त अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यामुळेच.. असं सांगून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलं.

बिहार ते बॉलीवूड या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना हा धागा मनोज वाजपेयी यांच्याशी कसा जोडला गेला आहे, याची आठवण या वेळी पंकज यांनी सांगितली. ‘बिहारमध्ये नेपाळहून वाहत येणारी एक गंडक नावाची नदी आहे. या नदीच्या उत्तरेकडील तीरावर चंपारण नावाचा जिल्हा आहे आणि दक्षिणेकडील तीरावर गोपालगंज नावाचा जिल्हा आहे. १९८८-८९च्या सुमारास वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, त्यात म्हटलं होतं की चंपारणमधून आलेला कोणी एक तरुण आज चित्रपटक्षेत्रात शिरला आहे आणि तो तिथे नावलौकिक मिळवतो आहे. ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. तो मुलगा होता अभिनेता मनोज वाजपेयी. त्या वेळी माझ्या मनात विचार आला नदीतीरावरच्या त्या भागातला मुलगा चित्रपटक्षेत्रात जाऊन अभिनेता बनू शकतो, मग मी का नाही बनू शकत? ती बातमी कायम माझ्याबरोबर राहिली,’ अशा शब्दांत आपल्या भावना पंकज यांनी व्यक्त केल्याच. त्याचबरोबरीने या पुरस्काराच्या निमित्ताने मनोज वाजपेयी यांच्याबरोबर हा क्षण अनुभवता आला हाही एक सन्मानच असल्याचे त्यांनी सांगितले. पंकज यांची ही आठवण या क्षेत्रात येणाऱ्या अनेक नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरेल. विशेषत: घराणेशाही, आतले-बाहेरचे असे वाद या सगळ्यात अडकलेल्या बॉलीवूडमध्ये काही उदाहरणे ही अशा संघर्षांचीही आहेत ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे.