आयुषमान खुराना हा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच फॉर्मममध्ये आहे. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ सारखे सुपरहिट चित्रपट आयुषमानने दिले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच चालले. प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून प्रशंसा या चित्रपटानं मिळवली. बॉलिवूड चित्रपटात आयुषमान प्रमुख भूमिकेत दिसतो तर आयुषमानचा भाऊ अपारशक्ती मात्र सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळतो. मात्र असं असलं तरी मी भावासोबत कधीही स्पर्धा करत नाही अशी कबुली आपरशक्तीनं दिली आहे.

‘तुलना ही दोन समान पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. आयुषमान हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असतो तर मी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत असतो. आमची कामं ही वेगवेगळी आहेत त्यामुळे आम्हा दोन भावांत तुलना होऊच शकत नाही. माझी त्याच्यासोबत स्पर्धा नाही’ असं मत अपारशक्तीनं व्यक्त केलं आहे.

‘दंगल’, ‘स्त्री’, ‘लुकाछुपी’ यांसारख्या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत अपारशक्ती झळकला. हिरोचा जीवलग मित्र अशी त्याची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये आहे. मात्र आयुषमान बॉलिवूडमधला यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. यंदाच्या फिल्म फेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्याने पटकावला. याबद्दल अपारशक्तीनं आयुषमानचं खूप कौतुकही केलं. मी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत खूश आहे सर्वांना हिरो व्हायचं आहे मात्र कोणीतरी हिरोच्या मित्राची भूमिका देखील साकारायला पाहिजे असं मत काही दिवसांपूर्वी अपारशक्तीनं मांडलं होतं.