जुन्या गाण्यांचे रिमिक्स करण्यावरून गेल्या दोन वर्षांमध्ये इतके वाद-प्रतिवाद झाले. जुन्या गायक-संगीतकारांबरोबर प्रीतमसारख्या आजच्या पिढीतील संगीतकारानेही याबद्दल केवळ असंतोष व्यक्त केला असं नाही तर कामही थांबवलं. मात्र त्याचा काडीचाही परिणाम चित्रपट संगीतक्षेत्रात दिसून येत नाही. जुनी गाणी रिमिक्स करण्याचा सिलसिला अजूनही थांबलेला नाही,उलट तो वाढीला लागला आहे. आता रिमिक्सला ‘रिमेक’ असे गोड नाव देत चित्रपटांप्रमाणेच जुनी गाणी नवे शब्द, सूर घुसवत पुन्हा प्रदर्शित करण्याचा फंडा सुरू झाला आहे. त्याचे हिणकस प्रत्यंतर सध्या ‘बागी २’ चित्रपटातील ‘एक, दोन, तीन..’ या मूळ ‘तेजाब’ चित्रपटातील गाण्याच्या रिमेक आवृत्तीच्या निमित्ताने समोर आले आहे. रिमिक्स ते रिमेक हा शब्दच्छल करूनही या गाण्यांमुळे निर्माण होणारे वादही काही थांबत नाहीयेत..

रिमिक्स असो वा रिमेक.. यांत फारसा फरक उरलेला नाही. किंबहुना, रिमेकपेक्षा रिमिक्स परवडले की काय अशी भावना मनात घर करून राहावी इतक्या भयंकर पद्धतीने गाण्यांच्या रिमेकचा फंडा दर चित्रपटागणिक जुन्या गाण्यांची वाट लावत सुटला आहे. याआधी जुन्या गाण्यांच्या रिमिक्स प्रकारात मूळ गाण्यात नवे बीट्स देत किंवा कधी नवीन गायक-गायिकांकडून गाऊन घेतले जायचे. रिमेक या प्रकारात मूळ गाण्याचे एखादीच ओळ किंवा अंतरा घ्यायचा आणि पुढे आपल्याला हवे तसे गाणे लिहून ते नव्या अवतारात सादर करण्याचा प्रकार संगीतकारांकडून सुरू झाला आहे. गेल्या वर्षी फिल्मी संगीतांच्या यादीत फक्त आणि फक्त रिमिक्स गाण्यांचीच धून ऐकायला येत होती. यावर्षीही हा सिलसिला सुरूच आहे, वेग थोडा मंदावला आहे किंवा गाण्यांची निवड जाणीवपूर्वक केली जाते आहे, असे फारतर म्हणता येईल. ‘बागी २’मध्ये आयटम साँग म्हणून झालेला ‘एक दो तीन’ या माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्याचा रिमेक अवतार ना लोकांना पसंत पडला आहे, ना मूळ चित्रपट दिग्दर्शक, गीतकार यांना.. माधुरीचं नृत्य, तिच्या मोहक अदांनी नटलेलं हे गाणं आता या पिढीसमोर आलंय ते जॅकलीन फर्नाडिसने सादर केलेलं आयटम साँग म्हणून.. मूळ गाणं उडत्या चालीचं असलं तरी त्यात एक निखळ मनोरंजन होतं. आता या गाण्यात घुसडले गेलेले शब्द, विचित्र संगीत आणि जॅकलीनचे भयंकर नृत्य याबद्दल ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट निर्मात्याविरोधात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच ‘बागी २’मधील ‘मुंडिया’ हे गाणेही याच रिमेक प्रकारामुळे वादात सापडले आहे. ‘मुंडिया ते बचके रही’ या मूळ गाण्याचा हा रिमेक अवतार आहे. १९९६ साली प्रकाशित झालेले हे गाणे पंजाबी संगीतातील अभिजात लोकप्रिय गाणे मानले जाते. या गाण्याचे गीतकार चरणजीत सिंग माकर यांनीही ‘बागी २’कर्त्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मूळ गाण्यातील पहिली ओळ आणि शेवटच्या कडव्यातील ओळ बदलण्यात आली असून बाकी सगळे गाणे आमचेच आहे, असे माकर यांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षीही अनेक रिमिक्स गाणी सगळ्या छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांमधून वाजली होती. गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच ‘ओके जानू’ चित्रपटातून ए. आर. रेहमान यांच्या ‘हम्मा हम्मा’ या गाण्याची धून बादशाहच्या आवाजात ऐकावी लागली. अर्थात, जुन्या गाण्याच्या ठेक्याला नव्या रॅपची जोड देऊन आलेले हे गाणे प्रसिद्ध झाले. तरी रिमिक्सचा हा प्रकार चुकीचाच नाही तर अत्यंत वाईट असल्याचे या गाण्याचा मूळ गायक रेमो फर्नाडिस याने म्हटले होते. ‘रईस’ आणि ‘काबिल’ या दोन बिग बजेट चित्रपटांमधून जुन्या गाण्यांचे रिमिक्स अवतार प्रसिद्ध झाले. ‘रईस’मध्ये १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील ‘लैला मै लैला’ हे गाणे रिमिक्स करण्यात आले होते. तर ‘काबिल’मध्ये ‘ज्युली’ चित्रपटातील ‘दिल क्या करे’ आणि ‘याराना’मधील ‘सारा जमाना’ ही दोन गाणी रिमिक्स करण्यात आली. ही दोन्ही गाणी संगीतकार राजेश रोशन यांनीच संगीतबद्ध केली होती आणि रिमिक्स अवतारालाही त्यांनीच संगीत दिले असल्याने त्यावरून काही वाद झाले नाहीत. मात्र रिमिक्स गाणी चित्रपटागणिक वाढतच गेली. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात ‘थानेदार’मधील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे रिमिक्स अवतारात आले. त्यातल्या त्यात या गाण्याच्या मूळ आवाजाला, धक्का न लावता त्यावर रिमिक्स संस्कार के ले गेले. वरुण धवनच्या ‘जुडवा २’मध्येही मूळ चित्रपटातील गाणी रिमिक्स अवतारात वाजवली गेली. ‘उची है बिल्डिंग’ आणि ‘चलती है क्या’ या दोन्ही नव्या गाण्यांना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. इथेही चित्रपटाचे सर्वाधिकार दिग्दर्शक म्हणून डेव्हिड धवन यांच्याकडे असल्याने वादाचा प्रश्न नव्हता. ‘मोहरा’ चित्रपटातील गाजलेले ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ हे गाणेही ‘मशीन’ नामक चित्रपटातून अत्यंत वाईट रिमिक्स प्रकारात ऐकवले गेले. चित्रपटांमधील जुन्या गाण्यांचे रिमिक्स करण्यावरून वाद होऊ नयेत म्हणून की काय पंजाबी गाजलेल्या गाण्यांचा रिमिक्स करण्याचा सपाटा चालू झाला.

‘राबता’ चित्रपटातले ‘मै तेरा बॉयफ्रेंड’ हे गाणे २००३ साली आलेल्या ‘ना ना ना ना’ या जे स्टार या पंजाबी गायकाच्या गाण्याची रिमिक्स आवृत्ती होती. तर ‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील ‘सूट सूट’ हे गाणेही पंजाबी संगीतकार गुरू रांधवा याच्या गाण्याची रिमिक्स आवृत्ती होती. रिमिक्स आवृत्तीही त्यानेच केली होती. याच चित्रपटात ‘एजंट विनोद’मधील ‘राबता’ हे शीर्षक गीत रिमिक्स करून वापरले गेले. दोन्ही चित्रपटांचे निर्माते एकच असल्याने इथेही वाद किंवा कोणी हरकत घेण्याचा प्रश्न नव्हता. मात्र सगळ्याच चित्रपटांमधून रिमिक्स गाणी वाजतायेत याचा अर्थ नव्या संगीतकारांकडे स्वत:चे गाणे निर्माण करण्याइतपत सर्जनशीलताच उरलेली नाही की काय? हा मुद्दा आता गांभीर्याने उपस्थित होतो आहे. पूर्ण गाणे रिमिक्स न करता जुन्या प्रसिद्ध गाण्याचा मुखडा, नाहीतर एखादीच ओळ उचलायची आणि त्याचा वापर करत नवे गाणे करायचे हा प्रकारही या नवनिर्मितीची क्षमताच हरवून बसल्याने के ला जातोय की काय, असेही म्हटले जात आहे. ‘मुबारकां’ चित्रपटातील ‘हवा हवा’ हे गाणे असेल किंवा ‘दिल जंगली’ या हल्लीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘गजब का है दिन’ हे गाणे असेल.. जुन्याच्या कुबडय़ा घेऊन पुढे जाणं हा एकमेव मार्ग असल्यासारखे सगळे संगीतकार याचे अंधानुकरण करत सुटले         आहेत. संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या मते, जुनी गाणी इतकी अभिजात आहेत. त्यांचे शब्द आणि सुरावट याशिवाय मूळ गायकी इतकी अप्रतिम असल्याने पिढय़ान्पिढय़ा बदलत गेल्या तरी ही गाणी त्याच गोडीने ऐकली जातात. त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्याउलट, नव्याने येणारी गाणी ही काही काळातच लोक विसरून जातात. म्हणूनच हा जुन्या गाण्यांचा आधार घेत रिमिक्स करण्याचा त्यातल्या त्यात सोपा प्रकार संगीतकारांकडून हाताळला जातो आहे. रिमिक्सचा हा ओव्हरडोस भल्याभल्यांसाठी त्रासदायक ठरला आहे. गेल्यावर्षी नितांतसुंदर संगीत देणाऱ्या संगीतकार प्रीतमला त्याचा मोठा फटका बसला. ‘राबता’ या चित्रपटात रिमिक्स गाणी घेण्याचा निर्णय प्रीतमला मान्य नव्हता. त्यामुळे तो या चित्रपटातून बाहेर पडला. गेल्यावर्षी त्याने ‘जग्गा जासूस’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ या दोनच चित्रपटांना संगीत दिले. मात्र जुन्या गाण्यांचे रिमिक्स करणार नाही, स्वत:चे संगीत देणार हा त्याचा आग्रह कायम आहे आणि त्याने तो जाहीरपणे व्यक्त केला. रिमिक्सचे हे वेड कुठेतरी थांबायला हवे मात्र अजूनही तसे होताना दिसत नाही. यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही एक तरी रिमिक्स गाणे आहेच. मात्र त्याविरोधात निदान आवाज तरी उठवला जातो आहे.. यावरच समाधान मानायचे का?