बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये बरीच उत्सुक्ता आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजय देवगणने देशात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपले मौन सोडले आहे. ‘देशात भरपूर असे विषय आहेत, ज्यावर आम्ही व्यक्त होऊ शकत नाही’ असे अजय म्हणाला. अजय देवगण सहसा कुठल्या वादात पडत नाही. तो नेहमीच स्वत:ला अशा वादांपासून दूर ठेवतो.

“देशात भरपूर असे विषय आहेत ज्यावर आम्ही बोलू शकत नाही, आम्ही एखाद्या विषयावर आमचे मत मांडले तर दुसऱ्याला ते आवडणार नाही. त्याला वाईट वाटेल. आम्ही काहीही बोललो तर आमच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटावर बंदी येऊ शकते. ज्यामध्ये निर्मात्याचे मोठे नुकसान होईल, मी स्वत: या चित्रपटाचा निर्माता आहे. चित्रपट अडचणीत यावा, अशी माझी किंवा या चित्रपटाशी संबंधित असलेल्या कोणाचीही इच्छा नाही. त्यामुळे काहीही बोलण्याआधी भरपूर विचार करावा लागतो” असे अजय देवगणने सांगितले.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील सहकलाकार सैफ अली खान सीएएच्या वादावर काही बोलला तर, लोक त्याच्याविरोधात आंदोलन सुरु करतील. त्यामुळे आम्हाला नीट विचार करुन जबाबदारीने बोलावे लागते असे अजय देवगण म्हणाला. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ एक ऐतिहासिक चित्रपट असून त्याचे ३ डी शूटिंग करण्यात आले आहे. पुढच्यावर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अजय देवगण या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याची पत्नी काजोल सावित्रीबाई तर सैफ अली खान उदयभान राठौडच्या भूमिकेत आहे.