आपल्या चित्रपटसृष्टीच्या एकशे चार वर्षांच्या वाटचालीत एकाच वेळेस तीन-चार चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वादात सापडण्याची घटना पहिल्यांदाच घडतेय. अधेमधे एखादा संवाद वा नावच अथवा अगदी पाकिस्तानी कलाकाराचा सहभाग यावरून अनेकदा वाद होतच असतात, पण यावेळची समांतर अथवा बाह्य़ सेन्सॉरशिपची भीतीदायक परिस्थिती काहीशी अस्वस्थ करणारीच आहे. ही परिस्थिती पाहता एकूणच आपला चित्रपट आशय व सादरीकरण यात प्रगती करण्यात खरेच यशस्वी ठरू शकेला का? याहीपेक्षा त्यांनी प्रगतीचा तसा प्रयत्न तरी करावा का, असा प्रश्नच निर्माण झाला आहे. ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकूणच हा चित्रपट, त्यातील आशय आणि वाद हा वरील पाश्र्वभूमीवर समजून घ्यायला हवा.

बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी पंचवीस वर्षे वाचनात आहे. पण तेव्हा त्यातील आशय व मांडणीवर कधीच कोणी आक्षेप घेतल्याचे वृत्त नाही. पैठण येथे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे दहावे करण्याची पारंपरिक रूढी ही एका गरीब कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यातून मग ज्या काही कौटुंबिक- सामाजिक घटना घडतात याचा अतिशय संवेदनशील वेध त्यात घेण्यात आला आहे. म्हणूनच ही कादंबरी आजही आपले अस्तित्व व वाचकमूल्य टिकवून आहे. अशा कादंबरीत चित्रपटायोग्य नाटय़ (या माध्यम व व्यवसाय याची मूलभूत गरज याच अर्थाने) आहे असे वाटणे स्वाभाविक होतेच. पण माध्यमांतर झाल्यावर व चित्रपट प्रदर्शनास सज्ज असतानाच पुणे येथील ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ने त्याच्या केवळ ट्रेलरवरून आक्षेप घेणे अजिबात योग्य नाही. अर्थात, एखाद्या चित्रपटावर बंदी आणा म्हणणारे आपले उपद्रवमूल्य वाढवण्यात रस घेतात. तो चित्रपट प्रदर्शित होऊ न तो पाहावा आणि मग आपल्या आंदोलनाची दिशा ठरवावी इतका संयम ते कधीच दाखवत नाहीत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

‘दशक्रिया’ ही कादंबरी व चित्रपट अशा दोघांची तुलना करून चित्रपटात काही चुकीचे दाखवलेय असा आक्षेप घ्यायचा तर ही दोन्ही माध्यमे भिन्न आहेत हे आधी लक्षात घ्यायला हवे. ‘दशक्रिया’ला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतात का? काही प्रमाणात होतात. याचे कारण चित्रपटात कथेचा फोकस काहीसा बदललाय. पैठण येथे हा विधी करणाऱ्या केशवभटजींची हाव व अहंकार याचीच ही गोष्ट आहे की काय असे वाटतेच. पण याच भूमिकेच्या कसदार अभिनयासाठी मनोज जोशीला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने तर ते अधिकच अधोरेखित होते. चित्रपट निर्मितीत व्यावसायिक घटकांवरही लक्ष द्यायचे अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हेतूमधूनच हा चित्रपट म्हणजे पत्रेसरकार (दिलीप प्रभावळकर) आणि केशवभट यांच्यात उत्तरार्धात निर्माण झालेला संघर्ष ठळकपणे समोर येतोय असेच वाटते.

माध्यमांतर करताना मूळ आशय कायम ठेवूनच पटकथा-संवादाची बांधणी व गाण्याच्या जागा यायला हव्यात. पण चित्रपटात तुल्यबळ कलाकार आहेत म्हणून काही तडजोड करावीशी वाटली असावी असा संशय येतो. संजय कृष्णाजी पाटील यांनी पटकथा- संवाद व गीतलेखनातून मूळ आशय कायम ठेवूनच इतर घटक मांडलेत. पण कादंबरीचा केंद्रबिंदू भानुदास हा शाळकरी मुलगा आहे, याभोवती मांडणी झाली असती तर चित्रपटाचा शेवट अधिकच गंभीर व परिणामकारक झाला असता. त्याऐवजी हा बिंदू केशवभटांवर केंद्रित झाला आहे. चित्रपट संपल्यावर आपण बौद्धिक मनोरंजन घेऊ न बाहेर पडलो अशी रसिकांची भावना झाली असती तर ते चित्रपटाचे मोठेच यश ठरले असते. महेश मांजरेकरांना ते ‘काकस्पर्श’च्या वेळेस साध्य झाले व अशा शोकाकूल विधीचे नाव चित्रपटाला देणे आवश्यक व योग्यदेखील आहे हेच सिद्ध झाले. या चित्रपटाचे नाव ‘पैठण’ ठेवायचे की ‘दशक्रिया’ यावर अगदी चित्रपट सेन्सॉरकडे पाठवायच्या रात्रौ उशिरापर्यंत समजत नव्हते, म्हणून महेश मांजरेकरांना रात्री साडेबारा वाजता दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे पाटील यांनीच चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीच्या वेळेस सांगितले. मांजरेकरांनी ठामपणे ‘दशक्रिया’ हेच नाव ठेवायला सांगितले. ‘पैठण’ नावाने चित्रपटाचे स्वरूपही स्पष्ट झाले नसतेच आणि ‘दशक्रिया’ हे चित्रपटाचे नाव असू शकते हे जाणून घेण्याची सुज्ञता मराठी चित्रपट रसिकांमध्ये निश्चित आहे.

‘दशक्रिया’च्या विधीपूर्वी मृत व्यक्तीच्या अस्थींची राख पाण्याकडे पाठ करून खांद्यावरून त्याचा नातेवाईक पिशवीतून पाण्यात सोडतो तेव्हा काही मुले त्याच पाण्यात उभे राहून लोखंडी जाळीत पकडून त्यातील सुट्टे पैसे गोळा करतात. भानुदासदेखील तेच करताना शाळेत अधेमधेच जातो. वात्रटपणा करतो. पण याच पैशातून भावाला शिलाई मशीन घेऊ न देण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याची हीच धडपड अखेरीस एक नाटय़मय वळण घेते. तो शेवटच या चित्रपटाची मोठी ताकद आहे. दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी याच ताकदीचा प्रभावी वापर केला असता तर हा चांगला चित्रपट उत्तम ठरला असता. भानुदासला सहानुभूती व विश्वास मिळायला हवा होता. अर्थात, म्हणून या चित्रपटाच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण विषय पडद्यावर आणला याचे महत्त्व कमी होत नाही.

‘श्वास’ (२००३) नंतर मराठी चित्रपट माणसाच्या जीवनातील विविध पैलूंचा शोध घेऊन एक बौद्धिक खाद्य देऊ  लागलाय. त्याच वाटेवरचा हा चित्रपट आहे. ‘श्वास’पूर्वीही मराठीत विविध विषयांवर सकस चित्रपट येत. त्याचे प्रमाण तेव्हा कमी असे. कारण त्या काळात मराठीत वर्षभरात वीस-बावीस चित्रपट निर्माण होत होते. आता निर्मितीची संख्या वाढतानाच प्रयोगशीलताही वाढलीय. (काही चित्रपट अपवाद आहेतच) देशविदेशातील चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट झेपावू लागलाय. मराठीला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळू लागले. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पूर्वी प्रत्येक वर्षी एक-दोनच चित्रपट असत. आता पॅनोरमात आठ तर मुख्य प्रवाहात एक (व्हेन्टिलेटर) असे एकूण नऊ  मराठी चित्रपट आहेत. नाटक व कादंबरी यावरून मराठी चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेला गती, आत्मविश्वास आणि यशही मिळू लागलेय. प्रेक्षकांपर्यंत हे चित्रपट पोहोचवण्याचे प्रयत्न होताहेत तसेच प्रेक्षकही सोशल मीडियातून अशा चित्रपटावर व्यक्त होतोय. हे सगळेच एकमेकांत गुंतलेय. पण या साऱ्यातूनच ‘दशक्रिया’सारख्या वैचारिक चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया व संख्या वाढते. असे चित्रपट एकदम आकाराला येत नाहीत, तर आजूबाजूची बदलती परिस्थिती खूपच महत्त्वपूर्ण असते. पण ती परिस्थिती नेमकी चित्रपट न पाहताच त्यावर बंदी आणाच अशा वृत्तीची असेल तर? तर मराठी-हिंदीच काय, कोणत्याही भाषेतील चित्रपटात कधीच वेगळ्या विषयाचा शोध घेतला जाणार नाही. असा एखादा चित्रपट गुणवत्तेत थोडासा कमीअधिक असेलही. त्याची तशीच चर्चा करताना पुढील कलाकृतीच्या वेळेस चुका सुधाराव्यात हाच प्रमुख हेतू असतो. पण ‘एक हजाराची नोट’, ‘बाबू बॅण्ड बाजा’ , ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘धग’, ‘फॅन्ड्री’, ‘अस्तू’, ‘सैराट’, ‘कासव’, ‘हलाल’, ‘कच्चा लिंबू’, ‘दशक्रिया’ यांसारखे भेदक अथवा अस्वस्थ, अंतर्मुख करणारे सामाजिक वस्तुस्थितीवरचे चित्रपट निर्माण होत आहेत हे जास्तच कौतुकास्पद आहे. तांत्रिक बाबीतही मराठी चित्रपटाने खूप प्रगती केलीय. (एखादा जुन्या वळणाचा येतोही.) संवादाचा भडिमार करून त्याचा ‘बोलपट’ करणेही मागे पडतेय. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे याची जाण वाढतेय. या सगळ्या प्रगतीच्या पाश्र्वभूमीवर समाजातील काहींना मात्र रूढी-परंपरांशी गल्लत करून चित्रपटच गोत्यात आणावासा वाटतोय, हे दुर्दैवी आहे.