करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनेकडून अनोख्या पद्धतीनं सलामी दिली गेली. मात्र या वैभवशाली सैन्याचा वापर जनसंपर्काचं माध्यम म्हणून केला जातोय, अशी टीका प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानीने केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने राग व्यक्त केला आहे.

‘एकीकडे फायटर जेटमधून पुष्पवृष्टी करून डॉक्टरांना सलामी दिली जात आहे तर दुसरीकडे पुरेसे पीपीई किट्स मिळत नाहीत याचा खुलासा केल्याबद्दल डॉक्टरांना निलंबित केलं जातंय. आपलं वैभवशाली सैन्य जनसंपर्काचं साधन बनलंय. गरीब मजूर घरी परतण्यासाठी वाहतुकीला पैसे देतोय आणि सरकार अशा कामांसाठी पैसा खर्च करतेय’, अशा शब्दांत विशालने सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतीय हवाई दलाकडून सुखोईसारख्या लढाऊ विमानांनी कोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात कोविड रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लाय पास्ट करण्यात आले.