बहुआयामी पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील इरसाल व्यक्तिरेखांना हिंदी जगतात चमकण्याची संधी मिळाली आहे. चितळे मास्तर, सखाराम गटणे, अंतू बर्वा, नारायण, पेस्तनकाका या अजरामर व्यक्तिचित्रांवर ‘नमुने’ ही हिंदी मालिका लवकरच छोटय़ा पडद्यावर झळकणार आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

संजय मोने यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणजेच पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत. तर सुबोध भावे आणि इतर मराठी कलाकारांचा मालिकेत सहभाग आहे. या मालिकेची निर्मिती ‘दशमी क्रिएशन्स’ने केली आहे.

प्रत्येक सकारात्मक गोष्टीत काहीतरी नकारात्मकच शोधणारा व्यक्ती या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तेव्हा ‘खुशी का डॉक्टर’ पु. ल. देशपांडे त्याच्या आयुष्यात येतात आणि नमुन्यांची ओळख करून देतात. हा मजेशीर ट्रेलर सुबोध भावेनं ट्विटरवर शेअर केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुलंची भूमिका करायची म्हटल्यावर त्यांचे लोभसवाणे रूप साकारणे हेच आव्हान होते, असे याआधी दिलेल्या एका मुलाखतीत संजय मोने यांनी सांगितलं.

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ तसेच खासगी आयुष्यातील काही घटना,  प्रसंगांवर आधारित ‘भाई’ नावाचा सिनेमाही पुढील वर्षी येणार आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.