संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’चा धसका काही चित्रपटांनी घेतला, आणि प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ आणि सिद्धार्थ मल्होल्त्राच्या ‘अय्यारी’ चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. तरीही सिद्धार्थच्या ‘अय्यारी’ला ‘पॅडमॅन’ आणि नाना पाटेकरांच्या ‘आपला मानूस’ या चित्रपटांशी स्पर्धेला सामोरे जावे लागणारच आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने हीच गोष्ट मांडत पॅडमॅनच्या निर्मात्यांना उपरोधिक टोला लगावला.

‘डिएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला की, ‘९ फेब्रुवारीला फक्त माझा चित्रपट प्रदर्शित होईल आणि वेगळा प्रेक्षकवर्ग मला भेटेल, असे मला सुरुवातीला वाटत होते. मात्र जिथून सुरुवात केली, पुन्हा तिथेच येऊन पोहोचलो आहोत असे वाटू लागले आहे. स्पर्धेपासून आम्ही पळ काढत नव्हतो. पण एकाच दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित झाल्यास नुकसान होणे साहजिक होते. पॅडमॅनबद्दलही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आम्ही निवडलेल्या प्रत्येक तारखेवर पॅडमॅन येऊन धडकतोय आणि तो आम्हाला एकटे सोडतच नाहीये (हसतो). प्रेक्षकांना कोणता चित्रपट आवडतो, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.’

वाचा : डार्विनच्या सिद्धांताचा आदिमानवांकडूनही निषेध; सत्यपाल सिंह यांना फरहानचा टोला

नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ या चित्रपटात सिद्धार्थसोबतच मनोज बाजपेयी, रकुल प्रीत, पूजा चोप्रा, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शहा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.