प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून भारतीयांना शाकाहारी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे. तिने ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेच्यावतीने हे पत्र लिहिले आहे. तसेच तिने या पत्रात देशातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
‘बेवॉच’ आणि ‘मॅरेड विथ चिल्ड्रन’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री पामेला आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी ती कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे तर नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे.
पत्रातून काय म्हणाली पामेला अँडरसन?
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र भारतातील लोक शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार अधिक करतात. देशातील प्रदूषण कमी करायचे असेल तर शाकाहाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण मांसाहारी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर वायू प्रदूषण होण्याचा धोका वाढतो. घरे, कारखाने, वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवले पाहिजे. त्यासाठी एखादी यंत्रणा तयार करावी.
रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, पॉलिएस्टर ऐवजी सुती कपड्यांचा वापर आणि प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्यांचा वापर करण्यास लोकांना प्रोत्साहित करावे. तसेच वायू आणि जल प्रदूषणासंबंधित नियम तयार करुन त्याबाबत लोकांना माहिती द्यावी व नियम तोडणाऱ्यास योग्य शिक्षा द्यावी. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होईल,असे पामेला अँडरसनने या पत्रात नमूद केले आहे.