‘माय नेम इज बॉन्ड जेम्स बॉन्ड’ असे म्हणत अभिनेता पियर्स ब्रॉसननने अनेक बॉन्डपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. कोणत्याही संकटाला सामोरे जाणारा आपल्या शत्रूवर बुद्धी चातुर्याने मात करणारा जेम्स बॉन्ड पियर्स ब्रॉसननने खुबीने रंगवला. मात्र याच जेम्स बॉन्डची अर्थात पियर्स ब्रॉसननची भारतातील पान मसाला कंपनीने फसवणूक केली आहे.

पानमसाला कंपनीने माझी फसवणूक केल्याचे हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसननने म्हटले आहे.पियर्स ब्रॉसनन हा अभिनेता काही दिवसांपूर्वीच एका पानमसल्याची जाहिरात करताना दिसला. ही जाहिरात झळकल्यानंतर त्याच्यावर टीका सुरु झाली. तसेच दिल्ली सरकारने अभिनेता पियर्स ब्रॉसननला कारणे दाखवा नोटीसही जारी केली. यावर दिलेल्या उत्तरात पियर्स ब्रॉसननने पानमसाला कंपनीने फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

पान मसाला आरोग्यासाठी हानिकारक असतो हे मला जाहिरात करण्याआधी सांगितले गेले नाही. ते सांगितले गेले असते तर ही जाहिरात मी स्वीकारली नसती. पान मसाला कंपनीने माझी फसवणूक केली. कंपनीने माझ्यासोबत केलेल्या करारात त्यांच्या उत्पादनामुळे काय नुकसान होऊ शकते याचा खुलासा केला नाही. तसेच इतर अटी आणि शर्थी काय असतात याचीही माहिती मला दिली नाही असे पियर्स ब्रॉसननने म्हटले आहे. दिल्ली आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एस. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पान मसाला कंपनीसोबतचा माझा करार संपला आहे. तसेच तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांविरोधात किंवा आरोग्याला हानीकारक असलेल्या उत्पादनांविरोधात तुम्ही जी मोहीम उभारली आहे त्यात मी सर्वतोपरी सहकार्य करेन असे आश्वासन पियर्स ब्रॉसननने दिल्याचे अरोरा यांनी सांगितले.

एवढेच नाही तर यापुढे अशा प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती कधीही करणार नाही असे लेखी आश्वासनही पियर्स ब्रॉसननने दिले आहे. कोणत्याही तंबाखूजन्य, पानमसाला, चहा पावडर यांच्या जाहिराती करण्याआधी सेलिब्रिटींनी दहा वेळा विचार करावा असे आवाहन अरोरा यांनी केले आहे. तसेच अभिनेते अभिनेत्रींनीही अशा उत्पादनांच्या जाहिराती करू नयेत कारण तरूण पिढी तुम्हालाच आदर्श मानत असते. तेव्हा अशा प्रकारचे करार करण्याधी दहावेळा विचार करा. असेही या अरोरा यांनी स्पष्ट केले.