लवकरच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत असणारा ‘सायना’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पण पोस्टर प्रदर्शित करताच पोस्टरमध्ये चूक असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी परिणीतीला आणि निर्मात्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘सायना’ चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये बॅडमिंटनचे शटल दिसत आहे. या शटलमध्ये सायना हे नाव लिहिले आहे. पण ते शटल सर्व्हिससाठी हवेत उडवण्यात आल्याचे पोस्टरच्या माध्यामातून भासवण्यात आले आहे. परिणीतीच्या ‘सायना’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चर्चेत आहे.

नेटकऱ्यांनी हे पोस्टर पाहता परिणीतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘बॅडमिंटन खेळताना शटलची सर्व्हिस वर हवेत उडवून केली जात नाही’ असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. ‘हाहाहा… बॅडमिंटनमध्ये टेनिसची सर्व्हिस?’ असे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे. एका यूजरने तर ‘हा सानिया मिर्झावर आधारित बायोपिक आहे की सायना नेहवालवर?’ असा प्रश्न विचारला आहे.

‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 2012 सालच्या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावलं आहे. तसेच आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आणि अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती. पण नंतर परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आहे.