माझ्या नव-याची बायको’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडचा ‘विरांगणा’ हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या लघुपटाला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला. या लघुपटाची लोकप्रियता थेट पॅरिसपर्यंत पोहोचली असून ‘पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हल’मधून या लघुपटाला आमंत्रण पाठविण्यात आलं आहे.

सीमेवर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नींच्या जीवनावर आधारित ‘विरांगणा’ हा लघुपट आहे. पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हल हा पॅरिसमधील मानाचा फिल्म फेस्टीव्हल मानला जातो. विशेष म्हणजे पॅरिस फिक्टिव्ह फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झालेली ‘विरांगणा’ ही भारतातली एकमेव शॉर्टफिल्म आहे.

‘विरांगणा’ म्हणजे धाडसी स्त्री. या लघुपटामध्ये मी एका सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारली असून देशाच्या रक्षणासाठी भारतीय सेना अहोरात्र कष्ट करत असते. आपल्या जीवाची तमा न बाळगता लढणा-या या सैनिकांना मानसिक बळ देण्याचे काम त्यांचे कुटूंबीय करतात. हे कुटूंबीय खरं तर आपले ‘अनसंग हिरोज’ आहेत. सैनिक हा कोणाचा तरी मुलगा, पती किंवा पिता असतो. पण आपली वैयक्तिक कर्तव्य बाजूला टाकून देशरक्षणाचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडणा-या सैनिकांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असतात, ते त्यांचे कुटूंबीय. देशासाठी स्वार्थ त्याग करणाऱ्या वीरपत्नींसाठी आम्ही हा लघुपट तयार केला आहे, असं आदिती म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, या लघुपटात एकही संवाद नाही. पार्श्वसंगीतावरच यामध्ये अभिनय करायचा होता आणि डोळ्यांनी संवाद साधायचे होते. अभिनेत्री म्हणून हे एक चॅलेंज होते. प्रेक्षकांकडून युट्यूबवर रिलीज झालेल्या या फिल्मला भरघोस प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर मानाच्या समजल्या जाणा-या फिक्टिव्हकडून आमंत्रण आल्याने मला अतिशय आनंद झालाट.

यंदा १२ आणि १३ एप्रिलला फेक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. टायनी टॉकीज आणि मुक्तायन निर्मित, आर आर विजन प्रस्तुत, सागर राठोड दिग्दर्शित विरांगणा ह्या लघुपटाला सई-पियुषने संगीत दिले आहे. लघुपटाची संपूर्ण संकल्पना ही अभिनेत्री आदिती द्रविडची आहे.