छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचं आणि प्रेक्षकांचं काही निराळंच नातं आहे. एका सामान्य कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. या मालिकेच्या माध्यमातून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजूपत ही जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि बघता बघता ती तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेला अलिकडेच ११ वर्ष पूर्ण झाले असून यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतची नेमकी निवड कशी झाली हे एकता कपूरने सांगितलं आहे.
मानव आणि अर्चना या भूमिकांमधून अंकिता आणि सुशांतने सगळ्यांची मनं जिंकली. विशेष म्हणजे सुशांत या मालिकेपासून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला. सध्या रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या या अभिनेत्याची पवित्र रिश्तासाठी निवड करताना अनेक जण साशंक होते. मात्र सुशांतने ही भूमिका उत्तमरित्या साकारली.
एकताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये सुशांत सिंग राजपूतची निवड कशी झाली हे सांगितलं आहे. “झी टीव्हीमुळे आम्हाला मिळालेली ही संधी फार मोठी होती. दाक्षिणात्य मालिका Thirumathi Selvam वर आधारित पवित्र रिश्ताची निर्मिती करण्यात आली होती. या मालिकेत आम्हाला सेकंड लीडसाठी एका नव्या चेहऱ्याचा शोध होता. यात आम्ही सुशांतची निवड केली होती. मात्र तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं झी टीव्हीच्या क्रिएटीव्ह टीमचं मत होतं.मात्र या मुलाच्या स्मितहास्यामुळे तो अनेक तरुणींच्या हृदयावर राज्य करेल अशी आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही या टीमचं मन वळविलं. विशेष म्हणजे सुशांतने आमचे शब्द खरे करुन दाखवले”, असं एकताने सांगितलं.
दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यावेळी या मालिकेने टीआरपीमध्ये अनेक वेळा पहिलं स्थान मिळविलं होतं. मात्र काही काळानंतर सुशांतने या मालिकेतून काढता पाय घेतला. त्याच्या जागी अभिनेता हितेन तेजावनीला रिप्लेस करण्यात आलं होतं.