असिफ बागवान

मानवी नातेसंबंधांमधील सर्वात नाजूक नातं असतं ते प्रेमाचं. हे एक असं नातं असतं, ज्यात समोरच्या व्यक्तीशी आपण केवळ रक्ताने जोडले गेलेलो नसतो, पण त्या व्यक्तीसोबत आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची आपली तयारी असते. तसं तर मैत्रीचं नातंही बिनरक्ताचंच, पण त्या नात्यात एक प्रकारचा कणखरपणा असतो. प्रेमाने जोडल्या गेलेल्या विवाहाच्या नात्यात विश्वासाची वीण भक्कम असेल तर ते आयुष्य सरेपर्यंत टिकून राहतं. पण ही वीण सैल पडली की ते नातंही दुरावत जातं. असं कशामुळे होऊ शकतं, त्याची कारणं काय असू शकतात, याची झलक आपल्याला ‘पवन अ‍ॅण्ड पूजा’ या वेबसीरिजमधून पाहायला मिळते.

‘एमएक्स प्लेअर’ या फारशा पाहिल्या न जाणाऱ्या पण तरीही काही दर्जेदार वेबसीरिजबद्दल ओळखल्या जाणाऱ्या ओटीटीवर ‘पवन अ‍ॅण्ड पूजा’ प्रदर्शित झाली आहे. महेश मांजरेकर, दिप्ती नवल, शर्मन जोशी, गुल पनाग, तारुक रैना, नताशा भारद्वाज अशी दमदार अभिनेत्यांची तगडी टीम असल्याने ‘ट्रेलर’ पाहताच तिच्याविषयी उत्सुकता चाळवली जाते. ही उत्सुकता पहिल्या भागापासून अधिक वाढत जाते.

पवन आणि पूजा ही पात्रे या वेबसीरिजचे केंद्रबिंदू आहेत, हे शीर्षकावरूनच समजतं. पण ही एखादी जोडी नाही. तर पवन आणि पूजा हीच नावे असलेल्या तीन जोडय़ांची ही कहाणी आहे.  तिन्ही वेगवेगळय़ा वयोगटातल्या, वेगवेगळय़ा पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या. यातील पहिली जोडी आहे महेश मांजरेकर आणि दिप्ती नवल यांची. निवृत्तीनंतरचं आयुष्य मजेत घालवत असलेलं हे जोडपं. त्यांना एक मुलगा आहे. पण आई-वडील आणि मुलगा असं नातं न ठेवता, त्यांनी आपल्या मुलालाही आपला मित्र बनवलं आहे. दुसरी जोडी आहे शर्मन जोशी आणि गुलपनाग यांची. यातला पवन बी ग्रेड चित्रपटांचा दिग्दर्शक आहे. खरं तर त्याची महत्त्वाकांक्षा स्वत:च्या जीवनावरच लाइव्ह चित्रपट बनवण्याची आहे. पण त्यासाठीचं आर्थिक बळ मिळवण्यासाठी हा ‘ब’ वर्गातल्या चित्रपटाचा व्यवसाय. त्याची जोडीदार असलेली पूजा ही अतिश्रीमंत कुटुंबात जन्मलेली स्वतंत्र विचारांची. तिसऱ्या जोडीत तारुक आणि नताशा हे पवन आणि पूजा आहेत. दोघेही ‘लाइक’ आणि ‘फॅन्स’चे भुकेले. इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या दुनियेत उच्च स्थान गाठण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेले. ही जोडी अजून बनलेली नाही.

तर पवन आणि पूजा अशी नावं असलेल्या या तीन जोडय़ा आपल्यासमोर येतात. एकाच नावाच्या तीन जोडय़ा असणं हा योगायोगच. पण या जोडय़ा प्रातिनिधिक, आपापल्या पिढीतील नातेसंबंधांचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण पुढे आपल्याला अनेक योगायोगांना सामोरं जावं लागतं. यातून अनेक गमतीजमतीचे प्रसंग घडतात आणि अनेकदा अंतर्मुख करणारे प्रसंगही समोर येतात. यातील सर्वात रंजक जोडी आहे ती मध्यमवयीन पवन-पूजा यांची. कामाचा ताण, महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पूर्ण होत नसल्याने स्वभावात मुरलेली चिडचिड आणि आर्थिक कारणांमुळे या पवनची लैंगिक इच्छा कमकुवत बनली आहे. सहा महिन्यांपूर्वी पूजाशी केलेला शरीरसंबंध त्याला ‘कालपरवाच तर झालं’ असा वाटतो. याचा पूजाच्या मनात राग आहे. तो राग ती सातत्याने टोमण्यातून, भांडणातून त्याच्यासमोर प्रकट करते. अगदी चारचौघांतही त्याला यावरून हिणवण्यात तिला गैर वाटत नाही. अशातच घटस्फोटाच्या पायरीवरून पुन्हा प्रेमात पडलेलं एक मित्र दाम्पत्य त्यांना भेटतं आणि मग त्यांनी अवलंबलेला मार्ग आपणही आजमावून बघावा, ही पूजाची इच्छा पवनही स्वीकारतो. त्यातून काही गमतीदार प्रसंग समोर येतात.

तिसऱ्या जोडीतील पवन आणि पूजा एकमेकांना भेटतात तेच मुळी शत्रू बनून. समाजमाध्यमात वर्चस्व कुणाचं, या स्पर्धेतून दोघेही एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना सहजीवनाच्या रिअ‍ॅलिटी शोची ऑफर येते. रग्गड पैसा मिळण्याच्या लोभाने हे दोघेही ती संधी स्वीकारतात. पण रिअ‍ॅलिटी शोसाठी ‘प्रेमाचा’ अभिनय करता करता ते खरंच एकमेकांच्या प्रेमात पडतात. हा शो चालवणाऱ्या कंपनीचा प्रमुख त्यांच्या कहाणीत खलनायक आहे. त्याची अधिकाधिक पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आणि आजच्या पिढीच्या प्रेम, सेक्सबद्दलच्या विचारांची कहाणी आपल्याला या जोडीद्वारे पाहायला मिळते.

या वेबमालिकेतील सर्वात साधीसरळ आणि तरीही सतत पाहावीशी वाटणारी सुंदर कहाणी महेश मांजरेकर आणि दिप्ती नवल यांनी साकारलेल्या पवन आणि पूजाची आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर आपल्याला भूतकाळातल्या अनेक गोष्टी आठवू लागतात. त्यातूनच बालपणी, तारुण्यात किंवा अगदी संसारात पडल्यानंतरही अपूर्ण राहिलेल्या इच्छाही प्रबळ होतात. अशा इच्छा पूर्ण करण्याची ‘लिस्ट’ हे जोडपे तयार करते. या यादीत पाकीटमारीपासून दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यापर्यंत असं काहीही आहे. त्यामुळे हे दाम्पत्य आपापल्या इच्छा पूर्ण करत असताना आपल्यालाही मनोरंजनाचा आनंद मिळतो. पण त्याहीपेक्षा महेश मांजरेकर आणि दिप्ती नवल यांची जुगलबंदी अधिक पाहावीशी वाटते. पवनचा बिनधास्त, मजेदार स्वभाव आणि वरकरणी हसत असली तरी आतमध्ये कशाने तरी पोखरली जात असलेली पूजा या व्यक्तिरेखा या जोडीने अतिशय अप्रतिमपणे साकारल्या आहेत. तिन्ही जोडय़ांपैकी या दोघांची जोडी सर्वात ताजीतवानी वाटते.

पवन आणि पूजा या वेबसीरिजचा पूर्ण भर हा ‘अर्बन रिलेशनशीप’वर आहे. त्याला ‘अर्बन’ म्हणायचं कारण, शहरी जीवनशैलीतून वैवाहिक जीवनात जे प्रश्न निर्माण होतात आणि त्या जीवनशैलीतूनच या प्रश्नांची उत्तरे जशी शोधली जातात, त्याचं प्रतिबिंब या मालिकेतून उमटतं. विषय म्हणून ही मालिका निश्चितच आकर्षित करते. एकाच वेळी तीन पिढय़ांतील जोडप्यांची गोष्ट पाहायलाही खूप मजा वाटते. पण त्यात खटकतात ते या कहाणीतील योगायोग. नावसाधम्र्याचा योगायोग आपण एकवेळ पचवू शकतो. पण कहाणीत विविध टप्प्यांवर या तिन्ही जोडप्यांची गोष्ट एकमेकांच्या कथेला छेडून जाते, हे काहीसं अजीर्ण होतं. त्यातून पुढे काय घडू शकतं, याची उत्कंठाही हळूहळू विरत जाते.

शाद अली आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मांडलेल्या, सादर केलेल्या या वेबसीरिजमध्ये काही ‘बोल्ड’ दृश्येही आहेत. पण ती अनावश्यक किंवा मुद्दामहून घुसडलेली नाहीत. अर्थात त्यामुळे ही वेबसीरिज प्रौढांसाठी मर्यादित होते. पण वैवाहिक नातेसंबंधांमधील चढउतारांचा अनुभव ज्यांना रोजच्या जगण्यातून येतो, त्यांना अशाच चढउतारांची गंमत अधिक वाटू शकते, नाही का?