‘पहरेदार पिया की’ ही मालिका जेव्हापासून सुरू झाली आहे त्या दिवसापासूनच ती वादांमध्ये अडकली आहे. या मालिकेच्या कथेवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आले. या वादात अजून न पडता आता निर्मात्याने मालिका १२ वर्षांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पहरेदार पिया की’ या मालिकेत १८ वर्षांच्या मुलीचा विवाह ९ वर्षांच्या मुलाशी होतो असे दाखवण्यात आले होते. या कारणामुळेच ही मालिका वादात अडकली. काही दिवसांपूर्वी मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल झाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ब्रॉडकास्टींग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिल’कडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य ते निर्णय घेण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत बीसीसीसीनं सोनी वाहिनीला मालिका प्रसारणाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना देत, मालिका रात्री दहा वाजता प्रसारित करण्यास सांगितले होते. इतकंच नव्हे तर ‘ही मालिका बालविवाहास प्रोत्साहन देत नाही’ अशी सूचनेची पट्टीही मालिकेदरम्यान चालवण्यास सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांनी या संपूर्ण वादावर आपली बाजू मांडण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषददेखील घेतली होती. मालिकेविरोधातील याचिकेला विरोध करणारे कित्येक जण टीव्हीही पाहत नाहीत असे निर्मात्यांनी यावेळी म्हटले होते. त्याचप्रमाणे ‘आम्हालाही आमच्या सीमा माहित आहेत. समाजाबाहेर जाऊन कुठलीही गोष्ट आम्ही मालिकेत दाखवत नाही आहोत,’ असंही त्यांनी स्पष्ट केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेशी निगडीत वाद आणि कारवाई टाळण्यासाठी लीप घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानसुार ३२ भागांनंतर लीप घेण्यात येणार आहे. मालिकेत लीप घेतल्यानंतर ‘रत्न’ची भूमिका कोण साकारणार यासाठी सध्या निवड फेरी सुरू आहे. ही भूमिका पुढे कोण साकारणार? आणि कथानकात काय बदल केले जाणार हे जाणून घेण्याची आता साऱ्यांनाच उत्सुकता आहे.