‘आशिकी २ पाठोपाठ ‘एक व्हिलन’ चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे ‘अच्छे दिन’ अनुभवणाऱ्या श्रद्धा कपूरबरोबर सर्वकाही ठीक नाहीये. अलिकडेच पार पडलेल्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत तिला एका निराशाजनक प्रसंगाला सामोरे जावे लागले. या पार्टीला उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी श्रद्धाचे छायाचित्र काढण्यास नकार देत, तिच्यावर बहिष्कार टाकला असल्याचे संगितले. माध्यमांबरोबरच्या वाईट वागणुकीमुळे तिच्यावर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धी काळात अनेकवेळा श्रद्धाने छायाचित्रकारांना पोझ देण्याचे टाळले. बऱ्याचवेळा तिचा व्यवस्थापक छायाचित्रकार आणि श्रद्धाच्या मध्ये येऊन छायाचित्रकारांना छायाचित्र काढण्यास मज्जाव करत असे. या पार्टीदरम्यान जेव्हा दिग्दर्शक मोहित सुरीने चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्राला मंचावर बोलावलं, तेव्हा छायाचित्रकारांनी छायाचित्र काढण्यास नकार दिला. हा प्रकार पाहून मोहित सुरी अचंबित झाला. याबाबतचे कारण विचारले असता, छायाचित्रकारांनी रितेश देशमुखला मंचावरून खाली बोलवून छायाचित्र न काढण्याचे कारण व्यक्तिगतरित्या कथन केले. जेव्हा श्रद्धा स्टेजवरून खाली उतरेल, तेव्हाच आम्ही छायाचित्र काढू, असे त्यांनी रितेशला सांगितले. हे ऐकून रितेश आश्चर्यचकीत झाला. सिद्धार्थ मल्होत्रानेदेखील छायाचित्रकारांना असे न करण्याची विनंती केली. श्रद्धाच्या व्यवस्थापकानेदेखील विनवणी केली. परंतु, छायाचित्रकार आपल्या या निर्णयावर ठाम राहिले. यावेळी श्रद्धाला रडू आवरले नाही. श्रद्धा मंचावरून खाली उतरल्यावरच छायाचित्रकारांनी छायाचित्र काढण्यासाठी आपले कॅमेरे सरसावले.