सायकलरिक्षा चालवणाऱ्यांची व्यथा मांडणारा ‘तानी’ या चित्रपटाच्या यशानंतर उपराजधानीत संजीव कोलते दिग्दर्शित ‘पिलंट्र’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला आज टेकडी गणेश मंदिरात खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.  
पूर्वी विदर्भात मोहरम असला की गावागावामध्ये मिरवणुकीमध्ये वाघाचे रूप घेऊन नाचणारे दिसत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे प्रमाण कमी झाले आहे. वाघाचे रूप घेऊन नाचणारा आणि सोबतच त्याच्यासोबत वाद्य वाजवणारे असायचे मात्र ही कला लोप पावत आहे. लोककला प्रकार असलेल्या या विषयावर आधारित हा चित्रपट असून त्याचे चित्रिकरणाला आजपासून नागपुरात सुरुवात करण्यात आली. सर्व स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
 प्रभाकर आंबोणे, मधू जोशी, वत्सला पोलकमवार, महेश पातूरकर, निरंजन कोकर्डेकर, महेश रायपूरकर, मधुरा, सचिन गिरी, नवीन दुरुगकर, मदन गडकरी, डॉ. मनोज आणि बालकलावंत चिन्मय देशकर यात भूमिका करीत आहे. चिन्मय देशकर या बालकलावंताने तानी या चित्रपटात भूमिका केली असताना या चित्रपटात मात्र तो मुख्य भूमिका करीत आहे.
टेकडीच्या गणपती मंदिरात शुभारंभ करण्यात आल्यानंतर बुधवार बाजारात चित्रिकरण करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात आठ दिवस चित्रपटाचे चित्रिकरण होणार आहे. नितीन नायगावकर यांनी गीते लिहिले असून अमन श्लोक यांचे संगीत आहे. नाना मिसाळ कलादिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. सुभाष दुरुगकर चित्रपटाचे निर्माते आहेत.