‘अ बॉटल फुल ऑफ होप’ अशी टॅगलाइन असणारा ‘पिप्सी’ हा आशयघन चित्रपट येत्या २७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. ‘लॅन्डमार्क फिल्म्स’च्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट वास्तवदर्शी होण्यासाठी ‘पिप्सी’ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील अरणी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाखा सोसावा लागला होता. या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, मात्र मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या दोघा कलाकारांनी खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता आपापला अभिनय चोख बजावला. या चित्रपटात अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील आणि पूजा नायक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या चित्रपटातील एक गाणेही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर ‘ता ना पि हि नि पा जा’ हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडते आहे. या सप्तरंगी गाण्याचे लेखन ओमकार कुलकर्णी यांनी केले आहे. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीची रंगीत सफर घडवून आणणाऱ्या या गाण्याला विदित पाटणकर आणि अनाहिता जोशी या बालगायकांचा गोड आवाज लाभला आहे. लहानग्यांचा गोंडस स्वर या गाण्याला लाभला असल्यामुळे ‘ता ना पि हि नि पा जा’ हे गाणे मनाला सुखावते. दोन बालकांची मैत्री आणि त्यांच्या ‘पिप्सी’नामक एका माशाची गोष्ट समाजातील वास्तवाकडे पाहण्याचा बालदृष्टिकोन देणार आहे. लहान मुलांच्या निरागस डोळ्यांतून सादर होत असलेली ‘पिप्सी’ची ही बाटली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच नवा दृष्टिकोनही देणारी ठरणार आहे.