अनिकेत विश्वासराव, हृषीकेश जोशी आणि चक्क दिलीप प्रभावळकर यांचे ‘सिक्स पॅक अॅब्ज’मधले पोस्टर झळकू लागले तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला होता. समीर पाटील दिग्दíशत आणि श्रेयस तळपदे निर्मित ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाची पहिली झलकच चच्रेचा विषय ठरली. त्यामुळे आता हा चित्रपट कसा असणार आहे याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. एकाच गावातील एक टपोरी उनाड मुलगा, एक शिक्षक आणि एक सधन कुटुंबातील शेतकरी एका पोस्टरच्या निमित्ताने एकत्र येतात आणि नंतर जी धमाल उडते, त्यावर ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाची कथा बेतलेली आहे. नुकतंच मुंबईमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आणि त्याचं एक प्रमोशनल गाणंसुद्धा चित्रित करण्यात आलं. या गाण्यात अनिकेत, हृषीकेश यांच्या सोबत दिलीप प्रभावळकर यांनाही नाचताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘पोश्टर बॉईझ’च्या निर्मितीमागची धम्माल गंमत निर्माता श्रेयस तळपदेकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
* श्रेयस, पोस्टरने तर खूप धमाल उडवली आहे. पोस्टरमधून असा काही प्रयोग करायचा हे कसं ठरलं?
खरंतर, मला खूप छान वाटतं जेव्हा लोकं म्हणतात की त्यांना पोस्टर खूप आवडलंय. आम्ही पहिल्यांदा जेव्हा या पोस्टरची संकल्पना मांडली तेव्हा दिलीप प्रभावळकरांपासून सर्वांनाच ती खूप आवडली. पण, जेव्हा आमचं पोस्टर तयार झालं तेव्हा माझ्या मनात शंका यायला सुरूवात झाली की, लोकांना हे पोस्टर आवडेल की नाही. त्यावर सगळ्यांच म्हणणं पडलं की आपल्याला आवडलंय ना मग लोकांनाही नक्कीच आवडेल. कारण, शेवटी आपणही प्रेक्षकांचाच एक भाग आहोत. तेव्हा कुठे हे पोस्टर लोकांपुढे आणलं. लोकांचा प्रतिसाद पाहून आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. अनिकेत, हृषीकेश आणि दिलीप प्रभावळकर अशी भन्नाट टीम लाभल्यामुळे एक मस्त धमाल चित्रपट तयार झाला आहे.
* या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच संगीतकार लेस्ली लुईस मराठी चित्रपटाला संगीत देणार आहेत. ही गोष्ट कशी जुळून आली?
काही महिन्यांपूर्वी एका अवॉर्ड शोला मी आणि लेस्ली लुईस अवॉर्ड द्यायला तब्बल ४० मिनिटे बॅक स्टेजला ताटकळत उभे होतो. त्यादरम्यान लेस्लींनी  मला, ‘मी काही नवीन चाली बनवल्या आहेत त्या सहज ऐकायला ये’ असं म्हटलं. नंतर माझ्या त्या चाली ऐकायच्या तर राहून गेल्या. पण या चित्रपटाला संगीत कोणी द्यायचं हा विचार आम्ही करत होतो तेव्हा मात्र लेस्लीचाच विचार माझ्या डोक्यात आला. त्यांना विचारले असता त्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता हो म्हटलं. त्यामुळे तो आमच्यासाठी सुखद धक्का होता. या चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यातून इतक्या वर्षांची त्यांची मेहनत आणि अभ्यास दिसून येतो. एक उदाहरणच द्यायचं झालं तर, चित्रपटातील एका गाण्याविषयक माझे विचार मी काही संगीतकारांना सांगितले होते. पण, कुणालाच मला नक्की काय हवंय हे कळत नव्हतं. तिचं संकल्पना मी जेव्हा लेस्ली लुईसना सांगितली तेव्हा ते म्हणाले, ‘तुला एकाच गाण्यात अॅक्शन, इमोशन आणि कॉमेडी तिन्ही गोष्टी हव्या आहेत, थोडक्यात तुला अमिताभ बच्चन हवेत.’ आणि त्यातूनच एका अशा गाण्याचा जन्म झाला आहे ज्यात एकाचवेळी ब्राझिलियन संगीत आहे, लावणीचा ठेका आहे आणि त्याचवेळी ते एक प्रेमगीत आहे.
*  प्रमोशनल गाणे करायचे कसं ठरलं?
आम्ही आधी हे गाणं फक्त शीर्षकगीत म्हणून अल्बममध्ये ठेवणार होतो. पण, नंतर गाणं इतकं सुंदर झालं की आम्ही ठरवलं, हे गाणं चित्रित करून प्रसिद्धीसाठी वापरायचं. बॉलिवूडमध्ये प्रमोशनल गाणी खूप गाजतात. कित्येकदा त्यांच्यावर चित्रपटाचं नशीब अवलंबून असतं. आपल्याकडे हॉलिवूडच्या चित्रपटांतून बॉलिवूडला नवीन कल्पना मिळतात. तसंच, बॉलिवूडमधून मराठी चित्रपटात त्या संकल्पना येतात.
* पोस्टर आणि या गाण्यातून तरी या चित्रपटात दिलीप प्रभावळकर एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसणार आहे असं दिसतंय..
आम्ही कलाकार म्हणून सर्वात प्रथम दिलीप प्रभावाळकरांचीच निवड केली होती. त्यांची निवड करायची ठरवलं तेव्हा खरंतर समीर खूप घाबरला होता. त्यांना पटकथा नाही आवडली तर? त्यांच्या घरी जाण्यागोदर आम्ही पटकथा वाचण्याचा खूप सराव केला होता. पण, त्यांनी गोष्ट ऐकल्यावर लगेचच हो म्हटलं. तेव्हा कुठे आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि चांगला चित्रपट बनवतोय हा विश्वास आम्हाला वाटायला लागला. पोस्टरचा पहिला नमुना पाहून त्यांना ‘हे काहीतरी नवीन आहे’ असं वाटलं आणि त्यांनी लगेचच हो म्हटलं. नृत्याचं पण असंच काहीसं झालं. पायाला दुखापत झालेली असूनही ते नाचण्यासाठी तयार झाले.