तेलगु अभिनेता पवन कल्याणचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. ‘जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यामुळे ते ब्लॉक करण्यात आले आहे. तज्ज्ञांकडून याबद्दल माहिती घेतल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असे जनसेना पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

पवन कल्याण २०१५ मध्ये ट्विटरवर आला होता. तेव्हापासून पवन ट्विटरवर फार सक्रिय असतो. त्याची मतं तो नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतो. पवनचे ट्विटरवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ८ मेपर्यंत पवन त्याच्या ट्विटरवर सक्रिय होता. पण, गेल्या तीन दिवसांपासून त्याचे ट्विटर अकाऊंट सुरू नसल्याची तक्रार त्याने केली. ‘पॉवर स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनला काही तांत्रिक बिघाडामुळे ट्विटर सुरू होत नसेल असे वाटले. पण, नंतर आपले अकाऊंट हॅक झाल्याचे कळताच त्याने याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी, आंध्र प्रदेशमधील अनंतरपुरा जिल्ह्यातील जनसेना पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना, राजकारणात पूर्ण वेळ कार्यरत राहण्यासाठी सिनेसृष्टीही सोडेल असे पवनने म्हटले होते.

यावर्षाच्या सुरूवातीला पवन कल्याणने ‘वीरम’ या तामिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये काम केले होते. त्याच्या या सिनेमाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमाने तिकीट बारीवर १५० कोटींहून अधिक कमाई केली होती. सध्या पवन दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या तेलगु सिनेमात काम करत आहे. तसेच पवन आणि चिरंजीवी हे लवकरच एकाच सिनेमात दिसणार आहेत, अशा चर्चाही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जोर धरत आहेत.