आजपर्यंतच्या सिनेकारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘जंजीर’ हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. मात्र या चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक प्राण यांनी २० वर्षांनंतर केलं. ‘स्वत:चे चित्रपट कधीच पाहायचे नाही, असा नियमच त्यांनी जणू पाळला होता. त्यामुळे ‘जंजीर’ हा चित्रपट त्यांनी २० वर्षांनंतर अचानक पाहिला. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. दोन दशकानंतर प्राणसाहेबांनी केलेले कौतुक मी आजही विसरू शकत नाही,’ असे बिग बी यांनी प्राण यांच्यावरील आत्मचरित्रात म्हटले आहे. प्रामाणिक, सचोटीचा अभिनेता, आपल्या भूमिकेत जीव ओतून टाकणाऱ्या प्राणसाहेबांकडून प्रत्येकवेळी नवीन शिकायला मिळाले, असेही बच्चन यांनी म्हटले आहे.

प्राण यांच्याविषयी ते पुढे म्हणाले, “१९६० मध्ये पहिल्यांदा आर. के. स्टुडिओमध्ये मी त्यांना पाहिले. अत्यंत विनम्र असलेल्या प्राण यांनी काहीही आढेवेढे न घेता लगेचच छायाचित्रही काढू दिले. ‘खलनायक’ या फारशा प्रसिद्ध नसलेल्या भूमिकेचा त्यांनी आपणहून स्वीकार केला आणि तो शेवटपर्यंत समर्थपणे पाळला. प्राणसाहेबांचा खलनायक म्हणजे समोरच्याला त्यांच्याबद्दल दहशत वाटावी, घृणा वाटावी. परंतु लोकांनी त्यांनी कमालीचे प्रेम दिले. ‘जंजीर’मध्ये मला भूमिका मिळण्यामागेही त्यांचाच वाटा होता. पोलीस ठाण्यातील एका चित्रिकरणाच्या वेळी शेरखानवर मी जोरात ओरडतो, असा प्रसंग होता. मी खूपच जोरात ओरडलो. त्याचे नंतर मलाच वाईट वाटले. परंतु प्राणसाहेबांना त्याबद्दल काहीही वाटले नाही. मात्र ज्या ज्या वेळी आपण प्राणसाहेबांबरोबर काम केले त्या प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. कामाचा जिवंत झरा म्हणजे प्राणसाहेब. ते खूप लाजाळू होते. परंतु प्रचंड प्रेमळ होते. आस्थेने सर्वाची चौकशी करीत. सेटवर ते लवकरच यायचे आणि उशिरा जायचे. काम संपले तरी ते थांबून राहायचे. आजारपणामुळे त्यांनी कधीही चित्रीकरण रद्द केले नाही. काही प्रसंगांमध्ये एकवेळ आम्हाला वेळ लागायचा. परंतु प्राणसाहेब मात्र नेहमीच पुढे असायचे.”

आणखी वाचा : “वडिलांनी मालिका पाहण्यास दिला होता साफ नकार”; ‘स्वीटी’ने सांगितल्या ‘हम पाँच’च्या आठवणी 

“प्राण म्हणजे जीवन. आपले संपूर्ण जीवन त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी बहाल केले. प्रेक्षकांमध्ये आपल्या भूमिकांनी एक प्रकारची दहशत त्यांनी निर्माण केली. परंतु वाईटावर चांगल्याचा विजय होतो, या वाक्यानुसारच ते आयुष्य जगले. सिनेमाचे तंत्र बदलले तरी प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान कधीही पुसले जाणार नाही. ते कायम स्मरणात राहिल,” असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.