‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा लवकरच ४००वा प्रयोग; टाळेबंदीनंतर रंगभूमीवर तिसरी घंटा वाजवणारे पहिले नाटक
लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : टाळेबंदीनंतर मराठी रंगभूमीवर पहिला प्रयोग करण्याचे धाडस करणाऱ्या अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा चारशे प्रयोगांचा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत घरात बसलेल्या प्रेक्षकांना नाटय़गृहापर्यंत आणण्याचे काम या नाटकाने केले. येत्या १४ मार्चला ४००वा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
राज्य सरकारने नाटय़गृहांना परवानगी दिली तरी निर्मात्यांपुढे अनेक आर्थिक अडचणी होत्या. शिवाय प्रेक्षक येतील का, हा मोठा मुद्दा निर्मात्यांकडून उपस्थित के ला जात होता. परंतु या सर्व आव्हानाला तोंड देत १२ डिसेंबरला टाळेबंदीनंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग करणाचे धाडस अभिनेते प्रशांत दामले यांनी केले. पुण्यातील पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांनी ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिला आणि नाटय़सृष्टीतील वातावरण सकारात्मक झाले.
पुढील आठवडय़ात हे नाटक ४००व्या प्रयोगाकडे वाटचाल करणार आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कोथरुड, चिंचवड येथे ६ मार्च ते १३ मार्चदरम्यान प्रयोग करून १४ मार्च रोजी ४०० व्या प्रयोगाची तिसरी घंटा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे वाजणार आहे. सलग आठवडाभर प्रयोग होणार असल्याने याला ‘लग्नाळू आठवडा’ असे विशेषण देण्यात आले आहे. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगणाऱ्या या नाटकाची कथा इम्तियाज पटेल यांनी लिहिली असून संहिता व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे.
टाळेबंदीनंतरच्या या प्रवासात राज्य सरकार आणि पालिकेचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी सहकार्य केले म्हणून नाटक उभे राहू शकले. एवढेच नव्हे तर वृत्तपत्र, कलाकार सगळ्यांनीच सांभाळून घेतले. करोनामध्ये काम करण्याची जोखीम आणि आर्थिक आव्हान होतेच. परंतु प्रेक्षकांवर असलेल्या विश्वासामुळे मी हे धाडस करू शकलो. काही अडचणी अगदी ऐनवेळी निर्माण झाल्या, पण त्यावरही मार्ग काढण्यात आला. कारण रंगभूमीवर काम करताना मिळणारी ऊर्जा अलौकिक आहे.
– प्रशांत दामले, अभिनेते-निर्माते