कलाकारांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार आणि त्यांच्या आयुष्यातील काही गुपितं गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न कलर्स वाहिनीवरील ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात केला जातो. या शोचे सूत्रसंचालन जितेंद्र जोशी करत आहे. जितेंद्र त्याच्या मस्तीखोर अंदाजाने शोमध्ये हजेरी लावणाऱ्या कलाकारांना बोलके करण्याचा प्रयत्न करतो. नुकताच त्याच्या या शोमध्ये अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर यांनी हजेरी लावली. दरम्यान प्रशांत दामले यांनी सुधीर भट यांनी अमिताभ बच्चन यांना नाटकाची ऑफर दिल्याचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

प्रशांत दामले आणि कविता मेढकर यांनी शोदरम्यान त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा १०००वा प्रयोग असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आधिच्या  नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. ‘एकदा सुधीर भटांनी अमिताभ बच्चन यांना आमच्याकडे एक नाटक आहे तुम्ही त्यात काम करणार का? असे विचारले होते. या नाटकाचे नाव “आप्पा आणि बाप्पा” होते. मी तुम्हाला नाटकाची स्क्रिप्ट पाठवतो’ असे सुधीर भट म्हणाले असल्याचे प्रशांत दामलने यांनी सांगितले. ते ऐकून शोचा सूत्रसंचालक जितेंद्र जोशीला हसू अनावर होते.

आणखी वाचा : शिवच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, वीणासमोरच केला खुलासा

याच शोदरम्यान प्रशांत दामलेंनी त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये पाठिंबा देण्याऱ्या व्यक्तीचा खुलासा केला होता. दामलेंच्या करिअरच्या सुरुवातीला अॅक्टींगला ज्येष्ठ नाटय़निर्माते सुधीर भट यांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले होते. ‘मला अॅक्टींगला सपोर्ट करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो सुधीर भट. नाटकात घेताना त्याने माझ्याकडे पाच-दहा पैसे आहेत म्हणून घेतलं असेल. पण त्याने सातत्याने मला नाटकात घेतलं. त्यामुळे आज जो मी ५०-५५ वर्षांचा आहे आणि जे काही मिळवले आहे ते या व्यक्तीमुळे. त्याच्यामुळेचे मी इथपर्यंत पोहोचलो आहे’ असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे. तसेच सुधीर भट यांच्या विषयी बोलताना प्रशांत दामले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.