प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच आणि त्यानंतर तो हरवून जातो. आपलं कुणीतरी असणं…त्या आपल्या माणसासाठी काहीही करणं…स्वताला विसरून जगणं आणि प्रेमात वेडेपणाचा कळस गाठणं यातलं सुख प्रेमात पडल्याशिवाय उमगत नाही. प्रेमाला वयाचंही कुंपण नसतं. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मनाला स्पर्शून जाणारी व्यक्ती आपली होते आणि एका मोरपंखी नात्याचा धागा आपसूक विणला जातो. प्रेम आणि संगीत हे समीकरण तर अगदी एकमेकांत एकरूप झालेले आहे. गाणं गुणगुणावसं वाटणं हेच प्रेमात पडल्याचं पहिलं लक्षण आहे. गाण्यातील शब्दात स्वत:च्या प्रेमाचं रूप न्याहाळताना अनेक प्रेमवीर कविता करू लागतात. त्यामुळे प्रेमाचं जग हे स्वरांच्या विश्वात नेणारं असतंच. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारी आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारी “प्रेम हे..” ही प्रेमकथांची मालिका झी युवावर २७ फेब्रुवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार पहायला मिळेल.

“प्रेम हे…” हा शो नावाप्रमाणेच पूर्णपणे प्रेमावर आधारित आहे . यात ठराविक सुरुवात , त्याचा मध्य आणि शेवट हे प्रेक्षकांना अपेक्षित वेळेमध्ये आहेत. झी युवा एपिसोडिक लव्ह स्टोरीज म्हणजेच प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवत आहेत आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच मराठी सिनेसृष्टीतील नामवंत आणि प्रतिभावान कलाकार वैभव तत्ववादी , तेजश्री प्रधान , प्रथमेश परब , स्पृहा जोशी , सिद्धार्थ चांदेकर , सुनील बर्वे , वीणा जामकर , सतीश पुळेकर वंदना गुप्ते आणि असेच अनेक दिग्गज मंडळींचा समावेश असेल . या प्रेमकथा शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आयुष्याच्या सांजवेळच्या प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे दाखवून देतील. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं आणि त्या व्यक्तीचं महत्व या प्रेमकथा पाहून नक्कीच जाणवेल.

आजच्या युगात माणूस कितीही प्रॅक्टीकल होत असला तरी त्याच्या आयुष्यात प्रेम नावाचा शब्द आला की तो विरघळतोच. आजूबाजूच्या गर्दीत एक अशी व्यक्ती मनाच्या तारा अलगद छेडते तेव्हा जाणवणारा आपलेपणा सगळं जगच बदलून टाकतो. एकटेपणा माणसाला साथ देऊ शकतो पण त्याची सोबत बनू शकत नाही. मनातलं बोलण्यासाठी… आनंदात त्याच्या मिठीत समरसून जाण्यासाठी, दु:खात त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडण्यासाठी हेच आपलं माणूस प्रेमाच्या पायवाटेनं आपल्या आयुष्यात येतं तेव्हा आपण आपले उरतच नाही. सगळ्या अपेक्षांच्या पलीकडे आकाराला येणाऱ्या या प्रेमाची रूपं आणि त्यातील अनुभूती अर्थातच व्यक्तीगणिक वेगळी असते. वयाच्या अनेक टप्प्यावरचं प्रेमही वेगळं असतं. पहिलं प्रेम हा तर अनेकांच्या मनातील नाजूक कप्पाच असतो. या सगळ्या प्रेमातला गुलाबी अनुभव “प्रेम हे.. “ या मालिकेच्या एकेक एपिसोडमधून हळूवार आठवणींचा अल्बम मांडणार आहे. संगीत ही आपली संस्कृती आहे. आपल्या संगीताच्या प्रवाहात अशी एकही भावना नाही जी गाण्यातून झंकारली नसेल. प्रेमातील आतुरता असो किंवा विरह…प्रेम मिळाल्यानंतरचा आनंद असो किंवा ते कायमचे दूर गेल्यानंतर येणाऱ्या पोकळीतील रितेपण असो… गाण्यातील भावनेसोबत प्रेम जगण्यातही वेगळीच मजा असते. माणसाच्या आयुष्यात जसं प्रेम ही भावना जपून ठेवण्याची गोष्ट आहे तशी संगीत ही रसिकता जपून ठेवण्याचं संचित आहे. सासूसून आणि किचन पॉलिटिक्स या परीघातून मात्र झी युवा हे नाव बाहेर पडलं आणि त्यातून युवकांच्या मनाची स्पंदनं टिपली. झी युवाने ह्या मालिकांची निर्मिती करताना मुख्यतः ह्या गोष्टींचाच विचार करून हे कार्यक्रम बनवले आहेत.