दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग भवनानी यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आता सर्वांचं लक्ष बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाकडे लागून आहे. हे जोडपंदेखील पुढील महिन्याच्या सुरूवातील विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहे. अद्यापही या दोघांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही. मात्र २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात राजस्थानमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(छाया सौजन्य : उमेद भवन/ इन्स्टाग्राम)

यासाठी जोधपूरमधल्या आलिशान उमेद भवन पॅलेसची निवड निक आणि प्रियांकानं केली असल्याचं समजत आहे. काही दिवसांपूर्वी निक-प्रियांकानं जोधपूरला भेटही दिली होती. एकीकडे बॉलिवूडमधले अनेक जोडपं लग्नासाठी भारताबाहेर जात आहेत मात्र प्रियांकानं भारतातच लग्न करण्याचं ठरवलं आहे.

(छाया सौजन्य : उमेद भवन/ इन्स्टाग्राम)

पारंपरिक भारतीय पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोनास कुटुंबीय आणि दोघांचा मित्रपरिवार खास लंडन आणि अमेरिकेतून राजस्थानमध्ये उपस्थिती लावणार आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीबरोबर ख्रिश्चन पद्धतीनंही  हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.