‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गल बन गयी’ या संगीत व्हिडिओने युट्यूबवर चांगलीच प्रसिध्दी मिळवली असून, तिच्यासाठी आनंदी होण्याची आणखी एक संधी चालून आली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने त्याच्या आगामी चित्रपटातील ‘आयटम साँग’साठी तिच्याशी संपर्क साधल्याचे समजते. जुन्या जमान्यातील ‘सारा जमाना’ या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘याराना’ चित्रपटातील गाण्याचा हा आधुनिक अवतार असेल. सर्वप्रथम ह्या गाण्यासाठी प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार करण्यात आला होता. सध्या ती हॉलिवूडमध्ये व्यग्र असल्याने ही सुवर्णसंधी उर्वशीकडे चालून आली. ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील गाणी आणि अलिकडेच प्रदर्शित झालेले ‘गल बन गयी’ गाण्यातून तिने नृत्यकौशल्य सिध्द केले आहे.
हृतिकचा अभिनय आणि निर्मिती असलेल्या ‘काबिल’ चित्रपटात हे गाणे दिसेल. ‘याराना’ चित्रपटातील हे मूळ गाणे हृतिकचे काका राजेश रोशन यांनी साकारले होते. प्रथम या गाण्यासाठी प्रियांकाशी संपर्क साधण्यात आला होता. सध्या तिने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला असल्याने तिने नकार दिला. ‘गल बन गयी’ या गाण्यातील उर्वशीचे नृत्य पाहून प्रभावित झालेल्या हृतिकने तिला या गाण्यात घेण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून समजले. सर्वकाही नीट जमून आल्यास ‘सारा जमाना’ गाण्याच्या रिमेकमध्ये उर्वशी थिरकताना दिसेल. रोमँटिक ड्रामा प्रकारातील ‘काबिल’ चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम हृतिकसोबत रोमान्स करताना दिसेल. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात रोनित रॉय आणि सोनु सूध यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. पुढील वर्षी २६ जानेवारीला हृतिकचा ‘काबिल’ आणि बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा ‘रईस’ एकमेकांसमोर ठाकणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 1:56 pm