येत्या काही वर्षांसाठी सलमानच्या चित्रपटांचं वेळापत्रक कमालीचं व्यग्र असणार आहे. सलमानच्या वाट्याला एकापाठोपाठ एक बिग बजेट चित्रपट येत आहेत. ‘रेस ३’ नंतर ‘दंबग ३’, ‘किक २’ ‘भारत’ आणि आणखी दोन चित्रपट सलमानच्या पदरात आहेत. नुकतीच संजय लिला भन्साळी यांनीदेखील एका चित्रपटासाठी सलमानची निवड पक्की केली आहे. अशातच सलमान ‘धूम ४’ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

जॉन इब्राहम, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा यांची भूमिका असलेला ‘धूम’ चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर ‘धूम २’ आणि ‘धूम ३’ हे चित्रपट देखील आले. हृतिक, आमिर खान या दोघांनी आपापल्या परिनं या चित्रपटाला यश मिळवून दिलं. आता ‘धूम ४’ देखील २०२० पर्यंत येणार असून यासाठी अर्थात सलमानचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. सलमानसोबतच रणवीर सिंगचं नावही यासाठी चर्चेत आहे. जॉन, हृतिक, आमिर खानप्रमाणे सलमानही या भूमिकेत चोराच्या भूमिकेत दिसू शकतो. यासाठी सलमानचा लूकही निश्चित करण्यात आला असून कदाचित सलमान लांब केस, चेहऱ्यावर ओरखडे अशा स्वरुपाच्या लूकमध्ये दिसू शकतो.

आदित्य चोप्रा २०१९ किंवा २० पर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याच्या विचारात आहेत, अशीही माहिती बॉलिवूडमधल्या काही खात्रीलायक सुत्रांकडून समजत आहे. मात्र यशराज फिल्मनं या चित्रपटाबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उघड न करण्याचं ठरवलं आहे.