‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय ठरल्या. मराठी वाहिन्यांमध्येच नव्हे तर सर्व वाहिन्यांमध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांनी जबरदस्त टीआरपी आघाडी घेतल्याचे दावे या वाहिनीने अनेकदा केले. भयंकर दुष्ट खलनायिका, महामूर्ख आणि तथाकथित साळसूद नायिका अशा एकदम टोकाच्या छटा व्यक्तिरेखांना देण्यात आल्या. ‘पुढचं पाऊल’ ही हर्षदा खानविलकरचा कसदार अभिनय वगळता बाकी सर्वाच्या न-अभिनयाने नटलेली मालिका प्रेक्षकांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरली खरी. परंतु आता या मालिकेचे काय होणार, अशी शंका निर्माण झाली आहे. प्रेक्षकांची सहानुभूती आणि पर्यायाने लोकप्रियता लाभलेली कल्याणी ही प्रमुख व्यक्तिरेखाच मालिकेतून गायब झाली आहे.
‘पुढचं पाऊल’ मालिकेचे चाललंय काय? असे म्हणायची वेळ प्रेक्षकांवर आली आहे. कल्याणीला मूल होते आणि ते गायब केले जाते. म्हणून ते बाळ शोधायला ती रुग्णालयातून बाहेर पडते आणि तीसुद्धा गायब होते. तिचे कपडे आणि दागिने सापडतात असे दाखवून ती अपघाती मरण पावली असे दाखविण्याचा प्रयत्न मालिकेत केला गेला. आता ही व्यक्तिरेखा मरण पावली असेल तर तिचा मृतदेह दाखवायला हवा. कल्याणीचे सरदेशमुख कुटुंब कोल्हापुरातील नामवंत, प्रतिष्ठित आणि मुख्य म्हणजे ‘पॉवरफुल’ कुटुंब असताना कल्याणीचा शोध लागू नये, तिचे फक्त कपडे सापडावेत एवढी नामुष्की कशी काय ओढवते? तेही असो, पण कल्याणी नाही म्हणून तिच्या नवऱ्याचे लग्न स्वप्नाली नावाची तरुणी अचानक उभी करून तिच्याशी लावले जाते. टीव्ही मालिका तर्कविसंगत आणि अतिरंजित दाखविण्याचा हा कळसच म्हणता येईल.
कल्याणीचे कपडे सापडले म्हणजे ती मेली हे जणू गृहीत धरण्यात आलेय. एवढेच नव्हे तर एखादी व्यक्ती सापडत नसेल तरी लगेच तिच्या नवऱ्याचे लग्न लावण्याचा घाट कसा काय घातला जातो? कायद्याचे बंधन सरदेशमुख कुटुंबावर नाही का येत? किमान सात वर्षे थांबावे असे कायदा सांगतो, तर मग कल्याणी सापडली नसताना किंवा मरण पावली हे सिद्ध झाले नसताना सोहम लग्नाला तयार कसा काय होतो?
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कल्याणीच्या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जोरावर चाललेल्या या मालिकेच्या ‘ब्रेक बम्पर’मधूनही कल्याणी ऊर्फ जुई गडकरी हिला गायब करण्यात आलेय. त्याऐवजी आता आक्कासाहेब ऊर्फ हर्षदा खानविलकर आणि खलनायिका रुपाली ‘ब्रेक बम्पर’मध्ये दाखविले जातेय. याचा अर्थ कल्याणी परत येणार नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रेक्षकांना गृहीत धरून आम्ही दाखवू ते त्यांना आवडेलच, अशा पद्धतीने मालिकेची वाटचाल सुरू आहे असे वाटतेय. म्हणूनच प्रश्न पडलाय ‘पुढचं पाऊल’चं चाललंय काय?