पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निधेष जगभरातून होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याचा निर्णय बॉलिवूडमधल्या २८ संघटनांनी घेतला आहे. आता सलमान खान यानंदेखील ‘नोटबुक’ या त्याच्या आगामी चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमान खानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटासाठी आतिफ अस्लमनं एक गाणं गायलं होतं. परंतु, सलमाननं हे गाणं हटवण्याच्या सूचना प्रोडक्शन हाऊसला दिल्या आहेत. आता हे गाणं पुन्हा एकदा नव्यानं रेकॉर्ड केलं जाणार असल्याचं समजत आहे. यापूर्वी मनसेच्या चित्रपट सेनेने इशारा दिल्यानंतर टी- सीरिज या म्युझिक कंपनीनं आतिफ अस्लमचं गाणं आपल्या युट्यूब चॅनेलवरून हटवलं होतं.

पुलवामामध्ये जो आत्मघातली हल्ला घडला त्याचा निषेध सलमान खाननं नोंदवला. शहीदांना श्रद्धांजली वाहत त्यानं त्यांच्या कुटुंबीयांसाठी निधीही जमवला होता. सलमानसोबतच अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनी पुढे येऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत पाठवली. तर दुसरीकडे ‘ ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. या पुढे एकाही पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करता येणार नाही जो कोणी पाकिस्तानी कलाकरांना काम देईल त्यांच्यावर कारावाई करण्यात येईल असं ‘ ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ आपल्या पत्रकात म्हटलं होतं.

या संस्थेबरोबरच ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ आणि ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ या दोन महत्त्वाच्या संघटना आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या २८ संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.