८०च्या दशकात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरणादरम्यान पुनीत इस्सर यांनी चुकून जोरात मारल्याने अमिताभ यांच्या पोटाला जखम झाली होती आणि ही घटना आजही अनेकांच्या लक्षात आहे. पण या घटनेनंतर पुनीत यांच्या हातून सात ते आठ चित्रपट गेले असल्याचे आता समोर आले आहे.

नुकताच पुनीत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान त्यांनी कूली चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेनंतर ७ ते ८ चित्रपट हातून गेल्याचे म्हटले. ‘ती घटना अतिशय दुर्दैवी होती. मला आजही आठवते कुली चित्रपटातील आम्ही एक अॅक्शन सीन शूट करत होते. फायनल टेकच्या वेळी आमचा टायमिंग मॅच झाला नाही आणि माझ्याकडून अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली’ असे पूनीत म्हणाले.

२६ जुलै १९८२मध्ये मनमोहन देसाई यांच्या कुली या चित्रपटाचे बंगळूरु येथे चित्रीकरण सुरु होते. एका सीनमध्ये पुनीत यांना अमिताभ बच्चन यांना मारण्याची अॅक्शन करायची होती. त्यावेळी तेथील टेबलचा कोपरा बिग बींना लागल्यामुळे दुखातपत झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेव्हाची ही घटना पुन्हा आठवून पूनीत म्हणाले, ‘अमिताभ यांना माहित होते या घटनेनंतर मी काळजी करत आहे. त्यामुळे मी जेव्हा त्यांना पाहण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेलो तेव्हा ते माझ्याशी प्रेमाने बोलले. तसेच त्यांना माझ्या भावना समजत असल्याचे त्यांनी म्हटले होते. कारण एका चित्रपटाच्या शूटींगवेळी विनोद खन्ना यांना देखील दुखापत झाली होती.’

‘त्या घटनेनंतर माझ्या हातून ७ ते ८ चित्रपट गेले. नंतर मला महाभारत ही मालिका मिळाली. माझी महाभारतामधील भीम या पात्रासाठी निवड करण्यात आली पण नंतर दुर्योधन हे पात्र साकारायला मिळाले’ असे त्यांनी पुढे म्हटले.