सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन आणि अभिनेता सुरज पंचोलीचे प्रेमसंबंध होते, असा खळबळजन दावा करणाऱ्या अभिनेता पुनीत वशिष्ठ विरोधात दिशाच्या वडिलांनी पोलीस तक्रार केली आहे. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यापूर्वी सुरज पंचोलीच्या कुटुंबीयांनी देखील पुनीत विरोधात पोलीस तक्रार केली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेता पुनीत वशिष्ठ याने सूरज आणि दिशाचे संबंध असल्याचा दावा केला होता. शिवाय त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. मात्र सुरजचे कुटुंबीय संतापताच त्याने ती पोस्ट डिलिट केली अन् माफी देखील मागितली. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आता दिशाच्या वडिलांनी देखील पुनीत विरोधात तक्रार केली आहे.

सुरजची माफी मागताना काय म्हणाला पुनीत?

आज तकला दिलेल्या मुलाखतीत सुरजची माफी मागितली. “मला माफ करा. ती पोस्ट मी चूकून केली होती. कोणावरही टीका करण्याचा माझा उद्देश नव्हता. मला वाटलं नव्हतं लोक माझ्या एका पोस्टकडे इतक्या गांभिर्याने पाहतील. मी ती पोस्ट डिलीट केली आहे. दिशा नावाच्या तरुणीबद्दल मला काहीच माहित नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतर माध्यमांद्वारे मी हे नाव ऐकलं. माझी लढाई सुरजसोबत नाही. केवळ घराणेशाही विरोधात आहे. कृपया माझ्या विरोधात कुठलीही तक्रार करु नका.” असं म्हणत पुनीत वशिष्ठ याने सुरज पंचोलीची माफी मागितली.