हास्यनिर्मितीतून एखादी कलाकृती सादर करणे हा स्तुत्य प्रकार असला तरी त्यातूनदेखील त्या संपूर्ण कलाकृतीचा परिणाम कसा होतो हे पण महत्त्वाचे असते. असा प्रयत्न हा टीआरपीसाठी उत्तम असतो, पण त्यातून ठोस काही हाती येत नसेल तर आणखीन एक वेबसीरिज इतपतच त्याचे स्वरूप राहते. ‘अमेझॉन प्राइम’वर १५ डिसेंबरला प्रदर्शित झालेली ‘पुष्पावल्ली’ ही वेबसीरिज काहीशी याच प्रकारात मोडते. या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनचे आठ भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. सुमुखी सुरेश या कॉमेडिअनने या वेबसीरिजचे लिखाण तर केले आहेच, पण त्यातील नायिकेची मध्यवर्ती भूमिकादेखील तिनेच केली आहे.

या वेबसीरिजचा विषय नक्कीच चाकोरीबाहेरचा आहे. दाक्षिणात्य कुटुंबात वाढलेली पुष्पावल्ली ही आरोग्यशास्त्रातील पदवधीर आहे. पण तिचे कुटुंब भोपाळ येथे स्थलांतरित झालेले असल्यामुळे पुष्पावल्लीवर दाक्षिण्यात संस्कृतीचा फारसा प्रभाव नाही. पदवीच्या अंतिम वर्षांत एका फुड एक्स्पोमध्ये अपघातानेच तिची भेट निखिल राव या निर्यातदार तरुणाशी होते. पुष्पावल्ली बोलण्यात पटाईत असल्यामुळे दोघांच्या गप्पा रंगत जातात आणि एक्स्पो संपता संपता ती निखिलच्या प्रेमात पडते. पण निखिलच्या मनात असे काही नसते. पदवी घेतल्यानंतर पुष्पावल्ली त्याच्या शोधात थेट बंगळुरू गाठते. तेथे जाऊ न ती नोकरी पकडते ती मात्र एका मुलांच्या लायब्ररीमध्ये. तिच्या शालेय मित्राच्या लायब्ररीतील तिची नोकरी ही केवळ निखिलच्या ऑफिसजवळ आहे हेच त्यामागचे कारण असते. पुष्पावल्लीच्या या आठही भागांत ती निखिलच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करत राहते, त्यातून ती काही अतिसाहसी गोष्टी करते, परिणामी अनेक गोंधळ निर्माण होतात, अगदी अनावस्था प्रसंगदेखील ओढवतात आणि त्यातूनच ती त्याच्या घरापर्यंतदेखील जाऊ न धडकते. पण अखेरीस तिच्या पदरी निराशाच येते.

पुष्पावल्लीची कथा ही आजच्या काळात घडणारी असल्यामुळे त्यात आजच्या काळाचे, वातावरणाचे प्रतिबिंब अगदी सहजपणे दिसून येते. पण ही वेब सीरिज एकूणच स्टॅण्डअप कॉमेडीच्या पायावर उभी आहे हेच वारंवार जाणवते. किंबहुना पुष्पावल्लीची भूमिका साकारणारी सुमुखी सुरेश ही कॉमेडीअन असल्यामुळे कथानकाचा बाज तोच राहिला असावा. तिचे अतरंगी उद्दय़ोग पाहताना कथा किती पुढे सरकणार यापेक्षा आत्ता नेमकी तिची फटफजिती कशी होणार याचीच उत्सुकता राहते. गेल्या काही वर्षांत अतिप्रसिद्धी मिळालेला स्टॅण्डअप कॉमेडी हा प्रकार एखाद्या भागापुरता पाहणे शक्य होऊ  शकते. पण सतत त्याच अंगाने कथानक जात असेल तर त्यातील गांभीर्य पुरते नाहीसे होते. पठडीबाज दाक्षिणात्य कुटुंबातील बंधने, लग्नाचे ठोकताळे, बाबाबुवांच्या आहारी नेणारी अंधश्रद्धा, महिलांच्या मासिक पाळीच्या निमित्ताने येणारी बंधने अशा अनेक मुद्दय़ांवर लेखिकेने तिरकस शैलीत चांगले भाष्य केले आहे. काही प्रसंगांत (निखिलचा कुत्रा लपवून ठेवणे) धम्माल मजादेखील अनुभवता येते, पण त्याच वेळी इतर अनेक प्रसंग तद्दन बालिश वाटावेत असे आहेत.

वेब सीरिज या माध्यमावर कसलीच बंधने नसल्यामुळे अनेकदा त्यामध्ये शिव्या किंवा लैगिंक दृश्यं अगदी उघडपणे दाखवली जातात. पण ते कथेच्या ओघात असतील तर त्यांचा कथेला फारसा धक्का लागत नाही. पण प्रत्येक वाक्यात चार शिव्या देणारे पात्र हे मुलांच्या लायब्ररीचा मालक आहे आणि सर्व मुलांच्या समोर रोजच तो हे करतो आहे हे जरा न पटणारे आहे. एखाद्याची संवादाची पद्धत अशी असू शकते पण त्यालादेखील स्थळकाळाचे भान असते. पण येथे मात्र तसे काही भान उरलेले दिसत नाही. त्या तुलनेत पुष्पावल्ली ज्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात आहे तेथील मालकीण अगदी थेट ऐकवणारी असून तिच्या प्रत्येक प्रसंगात भाव खाऊ न जाते. विशेषत: तिच्या प्रत्येक संवादाचा तो विशिष्ट टोन त्या प्रसंगात जिवंतपणा आणतो. किंबहुना सर्वच सहकलाकारांची निवड ही अगदी समर्पक झाली आहे. केवळ फोनवरच्या संवादातच आपल्याला दिसणाऱ्या पुष्पावल्लीच्या आईचा टोकदार दाक्षिणात्यपणा तिच्या प्रत्येक वाक्यागणिक थेट जाणवत राहतो. तोच प्रकार निखिलच्या कुटुंबाबत जाणवतो. थोडक्यात काय तर विशेष वेळ वगैरे न काढता निव्वळ टाइमपास म्हणून काहीतरी पाहायला हवं असेल तर पाहायला हरकत नाही अशी ही वेब सीरिज आहे.