‘मधुबाला’सारख्या गोड अभिनेत्रीवरून कसले आले आहे भांडण? पण मधुबालाचे नाव आपल्या नायिकेला देऊन त्याच नावाची भव्य मालिका ‘कलर्स’ वाहिनीवर यशस्वी करून दाखवणाऱ्या ‘नौंटकी फिल्म्स’ची निर्माता जोडी सौरभ तिवारी आणि अभिनव शुक्ला यांच्यातले भांडण ताणले गेले आहे. आत्तापर्यंत त्यांच्यातल्या तणावाची नुसतीच चर्चा होत होती. मात्र सौरभ तिवारी यांनी नुकतीच आपण नवीन निर्मिती संस्था सुरू केली असल्याची अधिकृत घोषणा क रीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण सध्या नौटंकी फिल्म्सच्या सुरू असलेल्या दोन मालिका ‘मधुबाला’ आणि ‘रंगरसिया’ यांच्या सर्जनशील आशयावर आपण लक्ष ठेवणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
‘मधुबाला’ ही कलर्स वाहिनीची आजवर सर्वाधिक टीआरपी असलेली मालिका होती. या मालिकेतील प्रमुख जोडी मधुबाला (द्रष्टी धामी) आणि आर. के. (व्हिवियन डिसेना) यांना न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता लाभली होती. असे असतानाही महिन्याभरापूर्वी या मालिकेच्या कथानकात १८ वर्षांची उडी घेण्यात आली. एवढेच नव्हे तर मधुबाला आणि आर. के. या दोन व्यक्तिरेखांना तिलांजली देऊ नही निर्माते थांबले नाहीत. तर मालिकेची ओळख बनलेल्या व्हिवियन डिसेनाला डच्चू देत द्रष्टीला पुढच्या कथानकात मधुबालाची मुलगी म्हणून आणण्याचाही निर्णय घेण्यात आला. मालिको लोकप्रिय असताना घेतल्या गेलेल्या या निर्णयांमागे सौरभ आणि अभिनव यांच्यातील भांडणांचा संदर्भ असल्याचे बोलले जात होते. मात्र त्या दोघांनीही त्याप्रकरणी कुठला खुलासा केला नव्हता. ‘नौटंकी फिल्म्स’ आणि सौरभ तिवारी हे नाव कलर्स वाहिनीशी सुरुवातीपासूनच जोडले गेले होते. किंबहुना ‘मधुबाला’सारखी चित्रपटसृष्टीची पाश्र्वभूमी असलेली मालिका यशस्वी करून दाखवण्यात सौरभ तिवारीचा मोलाचा वाटा होता. तरीही सौरभ तिवारी यांनी ‘नौटंकी फिल्म्स’चा निरोप घेतला असून स्वत:ची वेगळी चूल मांडली आहे. ‘तकीला शॉट्स’ नावाने त्यांनी आपली निर्मितीसंस्था सुरू केली असून या बॅनरअंतर्गत मालिकांबरोबरच चित्रपटनिर्मितीही करण्यात येणार असल्याचे सौरभ तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. अभिनव आणि माझ्यात काही वैचारिक मतभेद आहेत ते लक्षात घेऊनच वेगळे व्हायचा निर्णय घेतल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. ‘अभिनव आणि मी मिळून नौटंकी फिल्म्ससारखा यशस्वी बॅनर उभा केला याचा मला अभिमान आहे. नुकतीच आम्ही नौटंकी फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘एक्कीस तोफों की सलामी’सारख्या चित्रपटाची निर्मितीही पूर्ण केली आहे’, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सौरभच्या या नव्या ‘तकीला शॉट्स’मधून व्हिवियन डिसेना पुन्हा परतणार असल्याचीही चर्चा आहे.