बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी अभिनेता आर. माधवन याचा दरारा काही औरच आहे. उत्तम अभिनयशैली आणि फॅशनसेन्समुळे माधवन आजही अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. बॉलिवूडमधील ‘रहे ना हैं तेरे दिल में’ या चित्रपटातून लोकप्रियतेचं शिखर गाठणारा हा अभिनेता लवकरच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, माधवन इस्रोचे माजी ज्येष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक दिग्गजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली आहे. क्रीडाक्षेत्रापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांचा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. यामध्येच आता नम्बी नारायण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात माधवन पदार्पण करत असल्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. माधवननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटातील एक पोस्ट शेअर केलं आहे. या पोस्टरकडे पाहिल्यानंतर माधवनच नम्बी यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, अद्यापतरी मुख्य भूमिकेत कोण झळकणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
दरम्यान, आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक बयोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी, मेरी कॉम, संजय दत्त यांच्यावर बायोपिक आले असून अलिकडेच ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.