अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते. चौकटीबाहेरच्या भूमिका साकारत राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. राधिकाने नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘घोल’मध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता राधिका अॅपलच्या इंटनॅशल ड्रामा सीरिजमध्ये झळकणार आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे.
राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत ती अॅपलच्या सीरिजमध्ये काम करणार असल्याचे सांगितले आहे. या सीरिजचे नाव ‘शांताराम’ असे असून या सीरिजमध्ये राधिका अभिनेता रिचर्ड बॉक्सबर्ग आणि चार्ली हन्नमसोबत काम करणार आहे. राधिका या सीरिजबद्दल फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. राधिकाने तिच्या या आगमी सीरिजच्या बातमीचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘तुम्हाला ही आनंदाची बातमी सांगताना आनंद होत आहे’ असे राधिकाने फोटोला कॅप्शन दिले आहे.
‘शांताराम’ ही सीरिज ग्रोजोरी डेविड रोबर्ट यांच्या कादंबरीवर आधरित आहे. या सीरिजमध्ये राधिका एक भारतीय पत्रकार महिलेची भूमिका साकारणार आहे. तिचे नाव कविता असे असणार आहे. ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या सीरिजमध्ये १० एपिसोड असणार आहेत.