अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज ४ जून रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र चाहत्यांमधील उत्सुकता पाहाता निर्मात्यांनी सीरिज चक्क दोन तास आधी प्रदर्शित केली. सीरिज लवकर प्रदर्शित केल्यामुळे चाहत्यांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त केला. ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजच्या माध्यमातून तेलुगू सुपरस्टार समांथा अक्किनेनीने हिंदीमध्ये पदार्पण केले आहे.’द फॅमिली मॅन’ सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या यशानंतर आता या सीरिजचा पुढचा सिझन येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, द फॅमिली मॅन ३ मध्ये करोना काळ दाखवण्यात येणार आहे. श्रीकांत तिवारी केवळ करोना व्हायरसशी नाही तर चीनशी लढताना दिसणार आहे. ‘सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सीरिजची कथा अवलंबून असणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाउनमध्ये निर्माते राज आणि डीके यांनी सीरिजच्या तिसरा सिझन करण्याचा निर्णय घेतला. या तिसऱ्या सिझनमध्ये संपूर्ण जग या विषाणूच्या रुपात असलेल्या अदृश्य शत्रूविरूद्ध लढत असताना टास्क फोर्स चीनमधील शत्रूंशी लढताना दाखवण्यात येणार आहे’ अशी माहिती सूत्रांनी पिंकव्हिलाला दिली आहे.

आणखी वाचा : ‘फॅमिली मॅन’ मनोज वाजपेयीने खऱ्या आयुष्यात केली आहेत दोन लग्न; जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये चीनचं ‘गुआन यू’ हे भारताच्या विरोधातील मिशन दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, चीनच्या हान या राजवंशात गुआन यू एक सैन्य अधिकारी होते आणि त्यांना महान मानले जाते. ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सिझनमध्ये मुंबई, दिल्ली आणि कश्मीर दाखवण्यात आले होते. दुसऱ्या सिझनमध्ये चेन्नई, लंडन, मुंबई आणि दिल्ली दाखवण्यात आली. आता तिसऱ्या सिझनमध्ये पूर्वेकडील राज्य आणि नागालँड दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ‘द फॅमिली मॅन ३’ या सीरिजविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.