हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की अभिनेता राज कपूर यांच्या नावाचा उल्लेख झाल्यावाचून राहात नाही. विविध धाटणीच्या चित्रपटांना हात घालत विविध पात्रांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा एक अभिनेता म्हणजे राज कपूर. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला होता. आज या लोकप्रिय अभिनेत्याच्या वाढदिवशी सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

प्रेमात पडेलेल्या प्रत्येकाच्या मनात ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणं एकदातरी येतंच. या गाण्याची जादूच काही औरच आहे. राज कपूर आणि नर्गिस यांच्या केमिस्ट्रीने तर या गाण्याला चार चाँद लावले आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि तितकीच प्रभावी जोडी म्हणून या दोघांकडेही पाहिलं गेलं. रुपेरी पडद्यावर त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली खरी. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांच्या नात्यात बरेच वाद आणि अशी काही वळणं आली ज्यामुळे त्यांच्या नात्यातील ओलावाच नाहीसा झाला. अशा या सदाबहार जोडीच्या पहिल्या भेटीचा उल्लेख बऱ्याचदा करण्यात आला आहे. चला तर मग, पुन्हा एकदा जागवूया नर्गिस आणि राज कपूर यांच्या पहिल्या भेटीचा तोच किस्सा.

आणखी वाचा : Video : सारा अडखळली आणि तेवढ्यात कार्तिकने घेतली धाव

चित्रपटांच्याच दुनियेत रमणाऱ्या या जोडीची पहिली भेटही तितकीच रंजक होती. असं म्हणतात की, एका कामाच्या निमित्ताने राज कपूर नर्गिस यांच्या घरी गेले होते. त्यावेळी नर्गिस घरी एकट्याच होत्या. दार वाजलं तेव्हा ते उघडण्यासाठी म्हणून नर्गिस आल्या आणि त्यांनी दार उघडलं. स्वयंपाक घरातलं काम सोडून नर्गिस दार उघडण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा कसलंतरी पीठ त्यांच्या कपाळ आणि गालावर लागलं होतं. दार उघडताच नर्गिस यांच्या त्या सौंदर्यावर ‘शो मॅन’ राज कपूर भाळले. त्या सौंदर्यवतीने त्यांच्या हृदयात लगेचच घर केलं होतं. हा किस्सा ऐकताना अनेकांच्याच नजरेसमोर जणू या जोडीच्या पहिल्या मुलाखतीचं चित्रच उभं राहतं.

आणखी वाचा : होऊ दे खर्च : विराट अनुष्कानं लग्नासाठी केलेल्या खर्चाचा आकडा माहिती आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९४० ते ६०च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस यांच्या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या दोन्ही कलाकारांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ज्यामध्ये ६ चित्रपटांची निर्मिती ही ‘आरके बॅनर’ अंतर्गतच करण्यात आली होती. ‘आग’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ या अजरामर चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं, नर्गिस आणि राज कपूर यांची केमिस्ट्री. या दोन्ही कलाकारांच्या नात्याचे बंध शब्दात मांडणं तसं कठीणच. प्रेमाच्या सुरेख वळणावर असतानाही परिस्थिती आणि नियतीने त्यांच्यासोबत अशी काही खेळी केली की, नर्गिस आणि राज कपूर यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण, या प्रेमकाहणीचा आणि पहिल्या भेटीचा उल्लेख तेव्हाही होत होता, आताही होतोय आणि यापुढेही होत राहिल हे मात्र तितकच खरं.