तिकीटबारीवर पहिला, समाजमाध्यमांवरील चर्चेत पहिला, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका जगभर वाजविणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने या वर्षी ६०० कोटी रुपयांची कमाई करीत विक्रम नोंदविला. या चित्रपटाने दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि चित्रपटाचा नायक प्रभास यांचे अवघे आयुष्य बदलून टाकले आहे. ‘बाहुबली’च्या किमयेमुळे या दोघांचेही नाव फोर्ब्सच्या पहिल्या १०० सेलेब्रिटींच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
या वर्षी जूनमध्ये एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली दी बिगनिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पौराणिक कथेवर आधारित हा चित्रपट एवढा यशस्वी होईल अशी कल्पना खुद्द राजामौली यांनी केली नव्हती. महिश्मती राज्य, बाहुबली, कटप्पा अशी नावे आज घराघरांत सगळ्यांना परिचित आहेत. दक्षिणेसह सर्वत्र या चित्रपटाने सर्वाधिक गल्ला जमवत बॉलीवूडपटांनाही मागे टाकले. आजवर बॉलीवूडच्या ‘खाना’वळीचे चित्रपट सर्वाधिक कमाई करणारे म्हणून नोंदले गेले होते. तिथे दक्षिणेतून आलेल्या कोणी एका प्रभास नामक अभिनेत्याच्या चित्रपटाने ६०० कोटी रुपयांची कमाई केली हे पाहून चित्रपटाच्या वितरणाचे हक्क घेतलेल्या करण जोहरचेही डोळे विस्फारले आहेत. एवढेच नाही, तर सगळे रिअ‍ॅलिटी शोज् सोडून राजामौली यांच्याप्रमाणेच भव्यदिव्य चित्रपट करण्याकडे लक्ष दिले पाहिजे याचा साक्षात्कारही दिग्दर्शक करण जोहरला झाला. या चित्रपटाने इतरांचे जग एवढे बदलले तर प्रभास आणि राजामौली यांना नेमका काय फायदा झाला, यावर गेले कित्येक दिवस खल सुरू आहे.
फोर्ब्सच्या यादीत या दोघांचीही नावे आल्याने हे कोडे सुटायला मदत झाली आहे. या यादीत प्रभास २४ कोटी रुपये कमावणारा सेलेब्रिटी म्हणून ७७ व्या स्थानावर आहे.
या २४ कोटी रुपयांपैकी चार कोटी रुपये तर त्याला केवळ महिंद्रा कंपनीच्या जाहिरातीतून मिळाले आहेत. आणि बाहुबली चित्रपटासाठी त्याला २० कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. बाहुबली चित्रपटासाठी प्रभासने गेली दोन वर्षे अन्य कुठलाही चित्रपट न घेता जीवतोड मेहनत केली होती. त्यामुळे त्याच्या मेहनतीला २० कोटी रुपयांचे फळ मिळाल्याने त्याचे चाहतेही सुखावले आहेत. दिग्दर्शक राजामौली या यादीत ७२ व्या स्थानावर आहेत. त्यांना या चित्रपटासाठी २६ कोटी रुपयांचे मानधन मिळाले. सध्या त्यांची टीम बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या व अखेरच्या भागावर काम करीत आहे. २०१६ सालच्या मे महिन्यात या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होईल तेव्हाही अशीच किमया पाहायला मिळेल अशी अपेक्षा इंडस्ट्रीत व्यक्त केली जात आहे.