रजनीकांत यांचा चित्रपट म्हटला की तो सुपरहिट होणार, हे जणू समीकरणच ठरलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 2.0 नं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या कमाईनं कोट्यवधीची उड्डाणं घेतली आहेत. जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं अवघ्या आठवड्याभरात आपल्या निर्मितीचा खर्च जवळपास वसूल केला आहे. जगभरातून या चित्रपटानं ५०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा साडेपाचशे कोटी आहे त्यामुळे तिकिटबारीवरील कमाई आणि हक्क विकून मिळालेल्या पैश्यांतून 2.0 नं आपला निर्मिती खर्च वसूल केला आहे.

रजनीकांतबरोबरच अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका 2.0 मध्ये होती. तामिळ, तेलगू, हिंदी भाषेत हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता. केवळ हिंदीतून या चित्रपटानं १२२.५० कोटींची कमाई केली. आता पुढच्या काही दिवसांत 2.0 ची कमाई  ७०० कोटींच्या आसपास जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर ही शक्यता खरी ठरली तर हा नवीन विक्रम ठरेल.

मे २०१९ मध्ये चीनच्या १० हजार चित्रपटगृहात 2.0 दाखवण्यात येणार आहे. तब्बल ५६ हजार स्क्रीन 2.0 साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातल्या ४७ हजार स्क्रीनवर तो 3D मध्ये तो पाहता येणार आहे. त्यामुळे 2.0 ची एकूण कमाई ही यापेक्षाही दुप्पट असणार हे नक्की.