प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन यांचं त्रिकुट असलेला ‘दोस्ताना’ २००८ साली प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच वेगळी कथा दोस्तानाच्या निमित्तानं पाहायला मिळाली. यातील प्रियांका चोप्राचं ‘देसी गर्ल’ हे गाणं, अभिषेक आणि जॉनचं चुंबन दृश्य, जॉनचं बीचवरील दृश्य सारचं काही तरुणाईनं डोक्यावर उचलून धरलं. या चित्रपटाला समीक्षकांकडून समिश्र प्रतिसाद लाभला असला तरी तरुणाईकडून या चित्रपटाला तूफान प्रतिसाद लाभला.

गेल्या काही दिवसांपासून ‘दोस्ताना’ चा सिक्वल येणार अशाही चर्चा होत्या. करण जोहरच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चा हवेत विरल्या. मात्र पुन्हा एकदा राजकुमार राव या नावामुळे ‘दोस्ताना २’ चर्चेत आला आहे. ‘पिंकव्हिला’ च्या माहितीनुसार ‘दोस्ताना २’ साठी राजकुमार रावला विचारण्यात आलं आहे. राजकुमारनं ही ऑफर स्विकारली तर तो ‘दोस्ताना २’मध्ये पाहायाला मिळेल.

याआधी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचं नावही चर्चेत होतं. मात्र ऑगस्ट महिन्यात ट्विट करत ‘दोस्ताना २ या चित्रपटाबद्दल ज्या काही बातम्या ऐकायला मिळत आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. सिक्वलबद्दल लोकांनी वर्तवलेले अंदाज हे अत्यंत आधारहीन आहेत,’ असं करणने स्पष्ट केलं. एकिकडे करणनं ‘दोस्ताना २’ च्या साऱ्या शक्यता फेटाळून लावल्या असल्या तरी दुसरीकडे राजकुमार रावला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं असल्याचं समजत आहे.

सध्या राजकुमारच्या वाट्याला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘मेंटल है क्या’, ‘मेड इन चायना’ , ‘लाईफ इन मेट्रो’ असे मोठे चित्रपट आहे त्यामुळे राजकुमार ‘दोस्ताना २’ ला होकार देतो का हे पाहण्यासारखं ठरेल.