बेताल विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंतला हीच बडबड भोवली आहे. महर्षी वाल्मिकींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राखी सावंतला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. पण, पंजाब पोलिसांनी मात्र हे वृत्त फेटाळल्याचे सांगण्यात येत आहे. ‘इंडियन एक्सप्रेसने’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राखीला अटक झाली नसून, मुंबईला रवाना झालेले पोलीस पथक सध्या परतीच्या वाटेवर असल्याचे लुधियाना पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी आयटम गर्ल राखी सावंतने वाल्मिकी समाजात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचा ‘मारेकरी’ म्हणून उल्लेख केल्याने राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ९ मार्चला झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सलेमटाबरी पोलीस स्थानकातील पोलिसांचे एक पथक मुंबईत आले होते. या पथकाने मंगळवारी दुपारी राखी सावंतला ताब्यात घेतले. राखी सावंतला अटक करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

दरम्यान, राखी सावंतने तिच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते. ‘मला याबाबत काहीच कल्पना नाही. मला अटक होणार आहे याबाबत काही समन्सही मिळाले नव्हते. मी निर्दोष आहे.’, असे राखी म्हणाली होती.