‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. राखी सतत फोटो,व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. विशेष म्हणजे या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारी राखी यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. राखी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असून तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वाहिनी झी टिव्हीवरील ‘मनमोहिनी’ या मालिकेतून राखी कमबॅक करणार आहे. या मालिकेमध्ये राखी एका चेटकिणीची भूमिका वठविणार असून यात ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसणार आहे. राखीने एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली असली तरी मालिकेच्या निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

‘आयुष्यात मी सारं काही करुन पाहिलं. चित्रपट असो किंवा टीव्ही सीरियल आणि रिअॅलिटी शो. पण हॉरर मालिकेत किंवा चित्रपटात काम करण्याची कधी संधी मिळाली नव्हती. मात्र ‘मनमोहिनी’च्या माध्यमातून माझी ती इच्छाही पूर्ण झाली आहे’, असं राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

पुढे ती असंही म्हणाली, ‘मला अलौकिक शक्तींवर आधारित मालिका, चित्रपट पाहायला आवडतात. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सध्या अलौकिक शक्तींवर आधारित मालिकांना प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे’.

‘मनमोहिनी’ ही एका चेटकिणीच्या जीवनावर आधारित मालिका असून ती तिचं प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या मालिकेत रियहाना मल्होत्रा आणि अंकित सिवाच मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यातच आता राखी या मालिकेत येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. आतापर्यंत या मालिकेचे ३९ भाग प्रसारित झाले आहेत. राखी ‘नच बलिये’,’बिग बॉस’, ‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमांमध्ये झळकली होती. त्यानंतर मात्र तिने छोट्या पडद्यापासून फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं.