पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानवरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं. मात्र आता याच वक्तव्यावरून दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी इम्रान खान यांच्यावर उपहासात्मक शब्दात टिका केली आहे.

भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार अशी उघड धमकी देतानाच चर्चा करण्यासही तयार असल्याचे सांगणाऱ्या इम्रान यांना राम गोपाल वर्मा यांनी ट्विटवरुन सुनावले आहे. अनेक ट्विट करुन त्यांनी इम्रान खान यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यापैकी पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. ‘प्रिय इम्रान खान, चर्चेने प्रश्न सुटत असते तर तुम्हाला तिनदा लग्न करण्याची गरज पडली नसती.’ या ट्विटला १५ तासांमध्ये ५ हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केले आहे. तर २२ हजारहून अधिक जणांनी लाइक केले आहे.

या ट्विटबरोबरच राम गोपाल वर्मांनी इतरही ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग करत काही प्रश्न विचारले आहेत. एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे चर्चेचे आमंत्रण देणाऱ्या इम्रान यांना रामू विचारतात, ‘प्रिय इम्रान खान आम्हाला वेड्या भारतीयांना हेही सांगा की हजारो किलो आरडीएक्स घेऊन आमच्या दिशेने धावत येणाऱ्या व्यक्तीशी चर्चा कशी करावी. आणि या माहितीसाठी आम्ही भारतीय तुम्हाला पैसेही द्यायला तयार आहोत.’

पुढच्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा म्हणतात, ‘जर अमेरिकेला तुमच्या देशात कोण (ओसामा) लपून बसलय हे समजतं पण तुम्हाला समजत नाही. तर खरचं तुमच्या देशाला काय म्हणावं आम्हाला कळतं नाही. मी एक वेडा भारतीय विनंती करतोय की याबद्दल तुम्ही आम्हाला शिकवावे.’

चौथ्या ट्विटमधून त्यांनी थेट दहशतवादी संघटनांची नावे घेत इम्रान यांना सुनावले आहे. ‘प्रिय इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल कायदा हे तुमच्याच हातातील खेळणी आहेत हे आम्हाला ठाऊकच नाही. पण तुम्ही कधी या सर्वांवर तुमचे प्रेम नाही असं उघडपणे म्हणालेलं आठवत नाही.’

शेवटच्या ट्विटमध्ये वर्मा यांनी इम्रान यांना बॉम्ब म्हणजे क्रिकेटचे चेंडू वाटतात का असा खोचक प्रश्न विचारला आहे. ‘प्रिय इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल कायदा सारख्या संघटनांना तुम्ही चेंडूसारखे पाकिस्तानच्या सिमेरेषेपल्याड भारताच्या पव्हेलियनमध्ये पाठवता सर. तुम्हाला क्रिकेटचा चेंडू हा बॉम्बसारखा वाटतो का सर. आम्हाला सांगा सर, आम्हाला याबद्दल ज्ञान द्या.’

ट्विटवरुन वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्मा यांचे हे उपहासात्मक ट्विटस नेटकऱ्यांना चांगलेच आवडले आहेत. अनेकांनी वर्मांच्या या ट्विटवर तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये इम्रान खान यांनी सध्याचा पाकिस्तान हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे असं यावेळी इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी मागणी करत आम्ही कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे.तसेच भारताशी कधीही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं.

इम्रान यांच्या या पत्रकार परिषदेनंतर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली हा पुरावा इम्रान खान यांच्यासाठी पुरेसा नाही का? असा प्रश्न भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने उपस्थित केला. इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानचे वक्तव्यही परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढलं आहे. पठाणकोटमध्ये हल्ला झाला, उरीमध्ये हल्ला झाला तेव्हाही कारवाई करू असं पाकिस्तानने म्हटलं होतं. मात्र त्या फक्त पोकळ गर्जनाच ठरल्या पाकिस्तानकडून काहीही करण्यात आले नाही. हाच का तुमचा नया पाकिस्तान? असं इम्रान खान यांना परराष्ट्र मंत्रालयाने विचारलं आहे.