बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही रणबीर कपूरची फार मोठी चाहती आहे असं तिने अनेकदा म्हटलंय. त्याच्यासोबत एखाद्या सिनेमात काम करण्याचे तिचे स्वप्नही आहे. तिची सध्या सगळीच स्वप्न पूर्ण होत आहेत त्याप्रमाणे हे स्वप्नही पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल. लवकरच हे दोघं ‘ड्रॅगन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की याआधी रणबीर आणि आलियाने एकत्र काम केलं आहे. तेव्हा रणबीरचं वय फक्त २० वर्षे होतं तर आलिया १२ वर्षांची होती. दोघांनीही संजय लीला भन्साळी यांच्यासाठी काम केलं होतं.

एका मुलाखतीत याचा उलगडा करताना रणबीर कपूर म्हणाला की, ‘मी आणि आलियाने संजय सरांसाठी एक फोटोशूट केले होते. संजय सरांना आम्हाला घेऊन ‘बालिका वधू’ सिनेमाचा रिमेक करायचा होता. यासाठी आम्ही फोटोशूटही केलेले.’ आलियाबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, ‘मी तिला फार आधीपासून ओळखतो. ती फारच मनमिळाऊ आणि आनंदी मुलगी आहे. ती एक उत्तम अभिनेत्रीही आहे.’

https://www.instagram.com/p/BVU8miuDZJc/

रणबीर सध्या संजय दत्तच्या बायोपिकच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या व्यक्तिरेखेच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी रणबीरने आपल्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. एका मुलाखतीत या सिनेमाशी निगडीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रणबीरने संजयला लबाड म्हटले.

https://www.instagram.com/p/BSwhZ_7F9_g/

‘डेक्कन क्रोनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला की, ‘आम्ही गांधींवर सिनेमा करत नाही आहोत. संजय हा एक असा माणूस आहे ज्याला प्रेम आणि द्वेष समप्रमाणातच मिळाले. त्याने आपल्या चुका स्वीकारल्या आहेत. सिनेमात एका लबाड माणसाला दाखवण्यात येणार आहे. त्याचं आतापर्यंतच आयुष्यही विवादांनी भरलेलं होतं. त्याच्यात असणारा सच्चेपणा आम्हाला या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आणायचा आहे.’