कलाविश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अनेक वेळा सामाजिक मुद्द्यांवर त्यांचं मत मांडत असतात. त्या कलाकारांमध्ये अभिनेता रणदीप हुड्डाचा सुद्धा समावेश आहे. रणदीप अनेक वेळा समाजामध्ये घडणाऱ्या घटनांवर त्याचं मत मांडत असतो. काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातल्या चिमूर वनक्षेत्रामध्ये एक वाघिणी आणि तिच्या दोन बछड्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर अनेक स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यामध्येच रणदीपने सुद्धा वाघांच्या संरक्षणासाठी काही उपाययोजनांची गरज असल्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूरमधील चिमूर वनक्षेत्रामध्ये एक वाघिणी आणि तिच्या दोन बछड्यांवर विषप्रयोग करण्यात आला ही अत्यंत लज्जास्पद आणि दु:खद घटना आहे. या प्रकरणी तपास सुरु झाला आहे. यापूर्वीदेखील अशा काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणार का ?, कृपया या प्रकरणी काही तरी करा अशी विनंती रणदीपने पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

  दरम्यान, रणदीपने पहिल्यांदाच सामाजिक मुद्द्यावर त्याचं मत व्यक्त केलेलं नाही, यापूर्वीही त्याने अनेक वेळा अशा मुद्द्यांवर त्याचं मत मांडलं आहे. सध्या रणदीप त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ सारगढी’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत.