गेल्या वर्षी शाहिदला मुलगी झाली. इतर बाबांप्रमाणे त्यालाही त्याच्या मुलीशिवाय लांब राहणे कठिण जात आहे. एक बाबा घडण्याची पद्धत ही आयुष्यभराची असते, असेही शाहिद म्हणाला होता. यावेळी त्याने मुलगी, करिअर आणि त्याचा आगामी सिनेमा रंगूनबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या.
हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा त्यांनी रंगून सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली तेव्हा माझ्या आणि सैफबद्दलच्या चर्चांना उधाण येणार हे आम्हाला माहित होते. पण तो खरंच खूप चांगला माणूस आहे. त्याच्यासोबत काम करताना मला कधीच कोणताच त्रास झाला नाही. तो खूप कूल आहे. प्रत्येक गोष्टीशी तो सहज जुळवून घेतो. शेवटी आमचे उद्देश हे सिनेमा चांगला बनवणे हेच होते. त्यामुळे एकत्रित चांगलं काम करण्यावर आम्ही भर दिला.
‘रंगून’ सिनेमाविषयी बोलताना शाहिदने दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या कामाची प्रशंसा केली. शाहिद म्हणालेला की, विशाल भारद्वाज सरांसोबतचा हा माझा तिसरा सिनेमा आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी नेहमी खूप महत्त्वाचे आणि खास असते. लोक हा सिनेमा पाहतील आणि त्यांना तो आवडेल अशी मी अपेक्षा करतो. माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी रंगून प्रदर्शित होतोय. त्यामुळे अपेक्षा करतो की, सिनेमाच्या यशानेच मी माझा वाढदिवस साजरा करेन, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शाहिद असे म्हणाला होता. यात सैफ अली खान असून त्याने याआधी भारद्वाजसोबत ‘ओमकारा’ सिनेमात काम केले होते. तर अभिनेत्री कंगना रणौत यात मिस जुलियाची भूमिका साकारत आहे. शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रणौत अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.