अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांचा ‘सुर्यवंशी’ आणि ’83’ हे दोन्ही चित्रपट सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटांच्या प्रदर्शनाविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र, आता हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं रिलायन्स एन्टरटेन्मेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशीष सरकार यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

रणवीर सिंहचा ’83’ हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार होता. तर ‘सुर्यवंशी’ दिवाळीत प्रदर्शित होणार होता. मात्र, इतक्या कमी कालावधीत या चित्रपटाचं प्रमोशन करणं शक्य नसल्याचं सांगत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

‘सुर्यवंशी’ आणि ’83’ हे दोन्ही चित्रपट आता प्रदर्शित करणं शक्य नाही. लॉकडाउनमुळे असल्यामुळे अजूनही काही ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे हे चित्रपट यंदा प्रदर्शित न होता. २०२१ मध्ये जानेवारी किंवा मार्चमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार सुरु आहे, असं शिबाशीष सरकार यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पोलिसांची शौर्यगाथा उलगडण्यात येणार आहे. यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून रणवीर सिंग,अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तसंच ’83’ ’ हा चित्रपट लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.