आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर – अग्रवाल हिचादेखील समावेश होतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी रीना आपल्याला लवकरच अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला भोभाटा’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम , मयुरेश पेम अशा नामवंत कलाकारांचा अभिनय असलेला हा चित्रपट विनोदी असून, यात रीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळेल. ‘अजिंठा’ या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रिनाने आतापर्यंत वठवलेल्या तिच्या भूमिकेहून वेगळी अशी व्यक्तिरेखा ‘झाला भोभाटा’ मध्ये साकारली आहे. कराड जवळील एका गावात सध्या या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून, या चित्रपटाविषयी मी खूप उत्सुक असल्याचे रिनाने सांगितले.
रीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’ या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबतही काम केले आहे. शिवाय हिंदीच्या छोट्या पडद्यावरील ‘एजंट राघव’ या मालिकेमार्फत घराघरात पोहोचत असून सारा क्रिएशनचे अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ”कृष्णप्रिया’ या संगीतनाटकात ‘उदा बाई’ आणि ‘राधा’ ची भूमिका करताना देखील दिसत आहे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 1:53 pm