आपल्याकडे दर शंभर मैलांवर भाषा बदलते, संस्कृती बदलते असे म्हटले जाते. सध्या घरोघरी दैनंदिन मालिकांचे दळण दळणाऱ्या टीव्हीवर खास करून मराठी वाहिनीवर दर अध्र्या तासाला असाच भाषा-संस्कृती बदल अनुभवायला मिळतो आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरू होऊन आता १५० भागांची दौड संपली. मालिकेतील मालवणी भाषेच्या उच्चारांवरून सुरुवातीला वाद निर्माण झाले असले तरी आज ही भाषा अनेक घरांतून परिचयाची झाली आहे. मराठी भाषा त्यातही आपल्याकडची बोलीभाषा किती समृद्ध आहे हे वेगवेगळ्या प्रांतातून जाणवून देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर यांनी सांगितले.
सध्या ‘झी मराठी’वरच्या वेगवेगळ्या मालिकांमधून भाषा-प्रांतवार वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत आहेत. याआधी ‘स्टार प्रवाह’च्या ‘देवयानी’सारख्या मालिकेतून कोल्हापूरी भाषा, तिथली संस्कृती पाहायला मिळाली होती. ‘कलर्स मराठी’वर ‘सरस्वती’ मालिकेतून ग्रामीण बाज पाहायला मिळतो आहे.
मात्र ‘झी मराठी’ या एकाच वाहिनीवरून मालवणी भाषा, बनारसची शुद्ध हिंदी, ‘नांदा सौख्य भरे’सारख्या मालिकेतून ऐकू येणारी देशपांडय़ांची ब्राह्मणी मराठी आणि आता आगामी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून नागपुरी खटकेबाज संवाद ऐकायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या प्रांतात ‘झी मराठी’चे कार्यक्रम पाहिले जातात. त्यामुळे त्या त्या प्रांतातील बोलीभाषा किंवा तिथले संदर्भ मालिकेत आले की त्या त्या भागातील प्रेक्षकांनाही आनंद होतो. ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये मालवणी भाषा आली तेव्हा सुरुवातीला ती अगदी शुद्ध मालवणी नाही म्हणून टीका झाली, पण त्या भाषेचा गोडवा तर मालिकेत उतरला. आज ही मालिका आवडीने पाहिली जाते आहे. त्यामुळे एकमेव प्रमाण भाषेपुरते मर्यादित न राहता वेगवेगळ्या प्रांतातील भाषा, तिथली संस्कृती मालिकेतून लोकांसमोर यावी या हेतूने हा प्रयोग सुरू असल्याचे मयेकर म्हणाले.
मराठी मालिका अनेक अमराठी लोकांकडून पाहिली जाते हे लक्षात आल्यानंतर हिंदी-मराठी भाषा, संस्कृती एकत्र आणणारी ‘काहे दिया परदेस’सारखी मालिका सुरू केली. मुळात, सगळ्याच मालिकांमधील पात्रे एकाच प्रकारचे कपडे वापरतात, भरजरी साडय़ा घालून वावरतात, या गोष्टी खटकणाऱ्या होत्या.
त्यामुळे केवळ कथेत बदल न करता, आपल्याकडे असलेले भाषेचे सौंदर्यालंकार या पात्रांवर चढले तर आपोआपच त्या त्या प्रांताचे वेगळेपणही वेगळेपणही मालिकेत दिसेल, या विचाराने नवीन मालिकांची निर्मिती करताना हे बदल केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सध्या वाहिनीवर दर अध्र्या तासाला प्रादेशिक विविधतेची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. हा बदल प्रेक्षकांनाही रुचणारा असल्याने ट्रेण्ड म्हणून प्रादेशिक विविधतेची ही गंमत मराठी मनोरंजनविश्वात स्थिरावली तर दैनंदिन मालिकांमधील रंगत (आणि टीआरपी) आणखी वाढेल.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?