हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणा-या आयफा पुरस्कार सोहळा जवळ येऊन ठेपला असतानाच यंदाचा हा सोहळा चांगलाच गाजणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सोहळ्याबद्दल प्रत्येक कलाकाराच्या मनात उत्सुकता असून कलाकारांची पावले हळूहळू बँकॉकच्या दिशेने वळू लागली आहेत. त्यातच आता आणखी एक अभिनेत्री नुकतीच बॅकॉकला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.

आयफा म्हटलं की कलाकारांची मांदियाळी आलीच. त्यामुळे यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा कुठे होणार इथपासून या सोहळ्यात कोणकोणत्या सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स पाहता येणार याविषयीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच भर पडली आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची. रेखा या तब्बल २० वर्षानंतर आयफाच्या व्यासपीठावर परफॉर्म करणार आहेत.

नजरेच्या बाणाने अनेकांना घायळ करणा-या रेखा आज बँकॉकच्या विमानतळावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता त्या ख-या अर्थाने व्यासपीठावर थिरकण्यास सज्ज झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वांच्याच कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं आयफाचं हे १९ वं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याअंतर्गत जवळपास तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. २२ ते २४ जूनदरम्यान हे कार्यक्रम बँकॉक येथे पार पडणार असून यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या खांद्यावर आहे.